पाचोरा तालुक्यात आपत्ती अनुदानामध्ये फेरफार करीत 1.20 कोटींचा अपहार

महसूल सहाय्यकासह युवा प्रशिक्षणार्थीविरोधात गुन्हा दाखल

Pachora taluka incident : Revenue assistant and young trainee embezzled Rs. 1.20 crore पाचोरा (1 सप्टेंबर 2025) : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांच्या नावावर बनावट यादी तयार करून तब्बल एक कोटी वीस लाख 13 हजार 517 रुपयांचा शासकीय निधीचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार पाचोर्‍यातून उघड झाला आहे. या प्रकरणी पाचोरा तहसील कार्यालयातील तत्कालीन महसूल सहाय्यक अमोल सुरेश भोई आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
सन 2022 ते 2025 या कालावधीत शेतकर्‍यांना मिळणार्‍या आपत्ती अनुदानामध्ये फेरफार करत आरोपींनी 347 शेतकर्‍यांची बनावट नोंदणी केली तसेच लाभार्थींच्या खात्यात शासनाचे पैसे वर्ग करून ती रक्कम परस्पर काढून घेण्यात आली.

चौकशीत उघड झाला गैरप्रकार
चौकशी समितीच्या तपासात आरोपींनी पंचनामे व शासकीय दस्तऐवज बनावट तयार केले असल्याचे निष्पन्न झाले. या कामासाठी त्यांनी शासकीय कर्मचारी व लोकप्रतिनिधींचा वापर करून तहसीलदारांच्या लॉगिन आयडी व पासवर्डचा गैरवापर केल्याचे समोर आले.

या प्रकरणी तहसीलदार विजय बनसोडे यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत. अमोल सुरेश भोई यांच्याविरुद्ध निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून सध्या ते चाळीसगाव तहसील कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.

असा केला अपहार
अमोल भोई व युवा प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये पंचनामेच्या नोंदणींमध्ये खोटे व बनावट शासकीय दस्तावेत तयार केले त्यासाठी शासकीय कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी कुठे यांच्या वापर केला व यांनी शासनाचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तहसीलदारांच्या लॉगिन आयडी व पासवर्डचा गैरवापर केला.