Gutkha worth Rs 1 crore seized after thrilling chase in Muktainagar मुक्ताईनगर (3 सप्टेंबर 2025) : अवैध धंद्यांविरोधात पोलिस प्रशासनाने उघडलेल्या मोहिमेनंतर मुक्ताईनगर हद्दीतून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. संशयीत आयशर आल्यानंतर त्याला इशारा देण्यात आला मात्र त्यानंतरही चालकाने वाहन दामटल्याने पथकाने फिल्मीस्टाईल करीत वाहनासह चालकाला ताब्यात घेतले. या वाहनातून सुमारे एक कोटींचा गुटखा जप्त करण्यात आला. या कारवाईने गुटखा तस्कर हादरले आहेत.

गोपनीय माहितीद्वारे कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पूर्णाड फाटा येथे नाकाबंदी लावण्यात आली. संशयित आयशर (एम.एच.40 सी.डी.9358) आल्यानंतर पोलिसांनी थांबवण्याचा इशारा देवूनही वाहन चालकाने वाहन दामटल्याने पोलिसांनी पाठलाग करीत वाहन अडवले.
एक कोटींचा मुद्देमाल जप्त
आयशरची झडती घेतल्यावर 66 लाख 18 हजार 120 रुपये किंमतीचा प्रिमियम सुगंधित पानमसाला, 10 लाख 10 हजार 880 रुपये किंमतीचा जाफराणी जर्दा, 53 हजार 460 रुपये किंमतीचा झेडएनटू जाफरानी जर्दा, 25 लाखांचा आयशर ट्रक व 12 हजारांचा मोबाईल असा एकूण एक कोटी दोन लाख 33 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी ट्रक चालक आशिष राजकुमार जयस्वाल (ग्राम भमोरी, वॉर्ड नंबर 14, देवास, मध्यप्रदेश) याला अटक केली तर ट्रक मालक आशिक खान बुल्ला खान (शिवशक्ती नगर, दत्तवाडी, रा.नागपूर) याच्यावरही गुन्हा दाखल केला. अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड, मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ, पोलिस उपनिरीक्षक जयेश पाटील, सोपान गोरे, सलीम तडवी, छगन तायडे, रतन गीते, मयूर निकम, भरत पाटील, देश पाटील, भाऊराव घेते, तडवी, राकेश धनगर, संदीप धनगर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.