रेल्वेत पुन्हा गांजा तस्करी : नऊ लाखांच्या मुद्देमालासह ओडीशातील तिघांना बेड्या

Marijuana worth nine lakhs seized in Gandhidham Express in Bhusawal: Three from Odisha arrested भुसावळ (3 सप्टेंबर 2025) : अप 12994 गांधीधाम एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या सीआयबी पथकाला मिळाल्यानंतर पथकाने मंगळवार, 2 सप्टेंबर रोजी जळगाव-भुसावळ दरम्यान गाडीची श्वान पथकाला सोबत घेत तपासणी केल्यानंतर एस- 5 या स्लीपर कोच डब्यातून तीन संशयीतांना ताब्यात घेतले. आरोपींच्या बॅगेतून तब्बल 42.280 किलो गांजा जप्त करण्यात आला. या गांजाचे बाजारमूल्य सुमारे नऊ लाख रुपये आहे.

नलूमालु जसवंत डोरा (25, भोलाभांजा, जि.गंजम, ओडिशा), विप्र प्रकाश विद्याधर सेठी (19, रा.गोपालपूर, ता.कोंडाला, जि.गंजम, ओडिशा) व अलक सुभाषचंद्र बारीक (25, रा.धनंजयपूर, ता.कोंडाला, जि.गंजम, ओडिशा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रेल्वे सुरक्षा बलातील सीआयबीला गाडी क्रमांक 12994 अप गांधीधाम एक्सप्रेसच्या स्लीपर कोचमध्ये गांजा तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वीरू या डॉग स्कॉडसह आरपीएफ, जीआरपी यांच्या पथकाकडून भुसावळ-जळगाव दरम्यान गाडीची तपासणी करण्यात आली. एस- 5 या स्लीपर डब्यातील तीन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर त्यांना बॅगांसह ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष बॅगांची झडती घेतल्यानंतर 21 पाकिटांमध्ये आठ लाख 45 हजार 600 रुपये किंमतीचा 42.280 किलोग्रॅम गांजा तसेच 35 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले. तिन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा करण्यात आला. तपास लोहमार्ग पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर करीत आहेत.

आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी
अटकेतील तीन्ही आरोपींना भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींनी ओडीसातील गांजा अहमदाबाद येथे नेत असल्याची प्राथमिक माहिती दिली असून त्या अनुषंगाने आता गांजा खरेदीदारासह पुरवठादारांचा आता यंत्रणेकडून शोध घेतला जाईल, असे पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर म्हणाले.