Preparations for Ganesh Visarjan in Bhusawal complete : 14 roads on the main procession route will be closed for traffic on Saturday भुसावळ (4 सप्टेंबर 2025) : शहरात अनंत चतुर्दशी अर्थात शनिवार, 6 रोजी विघ्नहर्त्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. या विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मुख्य मिरवणूक मार्ग असलेल्या नृसिंह मंदिर ते स्टेशन रोडवरील अमर स्टोअर्स पर्यंतच्या मुख्य मार्गाला जोडणारे 14 उपरस्ते बॅरिकेट लावून बंद केले जाणार आहेत तर दुपारी 12 वाजेनंतर जामनेर रोड अवजड वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे.

14 रस्ते राहणार वाहतुकीसाठी बंद
शहरातील मुख्य मिरवणूकीला कन्या विद्यालय नृसिंह मंदिरापासून सुरवात होते. बाजारपेठेतील या मुख्य मार्गाला जोडणारे विविध 14 रस्ते वाहतूकीसाठी यंदाही बॅरिकेटींग करुन बंद केले जाणार आहेत. तर जामनेररोडवरील अवजड वाहतूक दुपारी दोन वाजेनंतर बंद केली जाईल. या मार्गावरील सर्व वाहतूक महामार्गावरुन वळविण्यात येणार आहे. मात्र सायंकाळपर्यंत दुचाकी वाहने, तीनचाकी रिक्षांना वाहतूकीची परवानगी असेल. जामनेर रोडला समांतर असलेल्या इतर रस्त्यांवरुनही या वाहनधारकांना वापरता येईल. या बाबतचा विस्तृत आराखडा नगरपालिका तयार करीत असून तो शुक्रवारपर्यंत जाहिर केला जाणार आहे.
मिरवणूक मार्गावरील हे रस्ते बंद
मिरवणूक मार्गावरील शाळा नंबर पाचकडे जाणारा, भास्कर मार्केट, शनीमंदिर वॉर्डाला जोडणारे तीन रस्ते, अप्सरा चौकातून व्हीएम मंदिर वॉर्डाला मार्ग, गणेश मॉल पासून शनीमंदिर वॉर्डला जोडणारा वखार मार्ग, मरिमाता मंदिर व्ही वॉर्डला जोडणारा, जामा मशिद लक्ष्मी चौकातील राम मंदिर वॉर्ड व खाल्लमा दर्गा भागाला जोडणारे दोन्ही मार्ग बंद असतील.
सराफ बाजारातून ओसवाल पंचायती वाडा, भजे गल्ली मार्ग , मॉर्डन फोटो पासून चिरागल्लीला जोडणारा मार्ग, जनता टॉवर पासून इस्कॉन मुरलीधर मंदिराला जोडणारा मार्ग हे मार्ग बंद असतील. शिवाजीनगर, गडकरी नगर, गुंजाळ कॉलनीम आदी सर्व पुर्वेकडील भागातील मंडळे मॉर्डनरोड मार्गाने मुख्य मिरवणूक मार्गावर येवू शकतील. स्टेशनरोड, जामनेररोड, यावलरोड हे मार्ग नेहमीप्रमाणे भाविकांसाठी सुरु असतील.
बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतरण
स्टेशनरोड व जामनेररोडवरील अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे एसटी बसस्थानकाचे सकाळी 11 वाजेनंतर रात्रीपर्यंत वरणगावरोडवरील एसटी डेपोमध्ये स्थलांतरण केले जाणार आहे. शहरात येणार्या व जाणार्या सर्व बसेस महामार्गावरुन वरणगावरोड मार्गे डेपोत येतील व त्याच मार्गाने महामार्गावर जातील. यावल व रावेरकडून येणार्या बसेस गांधी पुतळा, जळगावरोड, महामार्ग, नाहाटा महाविद्यालय, वरणगावरोड या मार्गाने शहरात येतील व जातील.
मिरवणूक मार्ग काँक्रिटीकरण
शहरातील जामनेररोडवरील कन्या शाळा ते अप्सरा चौक तसेच अमर स्टोअर्स ते बाजारपेठ पोलिस ठाणे हा मार्ग काँक्रीटीकरण झाला आहे. यामुळे भाविकांना दिलासा मिळाला आहे. यासोबतच अंतर्गत पर्यायी व्हीएम मंदिर वॉर्डातील रस्त्यांचेही काँक्रीटीकरण झाले आहे. मिरवणूक मार्गावरील अप्सराचौक ते मरिमाता मंदिर, सराफ बाजार या मार्गावरील खड्डेही पालिकेने बुजवले आहेत. यामुळे यंदा गणेशभक्तांना दिलासा आहे.
पालिकेचे नियोजन पूर्ण
मिरवणूक मार्ग, तापीनदीच्या विसर्जन घाटावरही बॅरिकेटींगसह जनरेटर, प्रखर प्रकाश देणारे दिवे, सीसीटिव्ही कॅमेरे, अधिकार्यांसोबत फिरते कॅमेरे आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सुमारे 600 पेक्षा अधिक हॅलोजनमुळे रस्त्यांवर उजेड राहिल. पालिका प्रशासनाच्या माध्यमातून गणेशभक्तांना सर्व सेवा सुविधा देण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे भुसावळ पालिकेचे उपमुख्याधिकारी परवेज अहमद म्हणाले.