An adult in Mohadi died after falling under a moving train. जळगाव (5 सप्टेंबर 2025) : जळगाव तालुक्यातील मोहाडी गावातील 45 वर्षीय व्यक्तीचा धावत्या रेल्वेखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 2 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. जयेश भागवत चौधरी (45, रा.मोहाडी, ता. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

रेल्वे रूळावर आढळला मृतदेह
जयेश चौधरी हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. गेल्या रविवार, 31 ऑगस्टपासून ते घरात कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडले होते. शोध सुरू असताना मंगळवारी रात्री मोहाडी गावाजवळील रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली आणि मृतदेहाची ओळख पटवली.
जयेश चौधरी यांचा धावत्या रेल्वेखाली आल्यानेच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.