चाळीसगाव (5 सप्टेंबर 2025) : शहरातील मालेगाव रोडवरील शिवनेरी प्रकल्पाचे काम करणार्या सुपरिअल्टी बिल्टकॉन एलएलपी, मुंबई व लक्ष्मी वरद इन्फ्रा. प्रा. लि. या कंपन्यांचे मजुरांचे पगार, बांधकामासाठी लागणार्या साहित्याची खरेदी व इतर खर्चासाठी लागणारी सुमारे 45 लाखांची रोकड, 16 हजार रुपये किंमतीचा हार्डडिस्क आणि 300 रुपये किंमतीचा पेन ड्राईव्ह असा सुमारे 45 लाख 16 हजार 300 रूपये किंमतीचा ऐवज छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयातून लांबवण्यात आल्याने खळबळ उउडाली आहे. संशयीत सुनील पंढरीनाथ चौधरीविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे चोरी प्रकरण
कंपनीच्या प्रकल्प संचालकाच्या सुपरिअल्टी बिल्टकॉन एलएलपी मुंबई या कंपनीचा चाळीसगाव येथे मालेगाव रोडवर शिवनेरी पार्क या नावाने पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी गृह प्रकल्प सुरू आहे. कंपनीची मालेगाव रोड येथे साईट व ऑफीस असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यालय आहे.
या प्रकल्पाचे बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट लक्ष्मी वरद इन्फ्रा. प्रा. लि. या कंपनीस काम दिले आहे. या कंपनीचा प्रशासकीय व आर्थिक काम याच कार्यालयातून होते. या दोन्ही कंपन्यांनी वेळोवेळी दैनंदिन व इतर खर्चासाठी रोख रक्कम तसेच शिवनेरी पार्क येथे वास्तव्यास असलेल्या ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने जमा केलेली अशी एकूण 42 लाख रूपये 30 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात ठेवलेले होते.
ही रक्कम व काही कागदपत्रे तसेच पेन ड्राईव्ह व हार्डडिस्क दिसून आले नाही. त्यामुळे प्रकल्प संचालक राजेंद्र रामसिंग पाटील यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज पाहिले असता सकाळी 7.26 वाजेच्या सुमारास एक मुलगा वॉचमनकडून चावी घेऊन झाडू घेऊन आत फिरला. लाईट बंद करून पिशवी घेऊन आत गेला व एक गोणी घेऊन आला व पिशवीसह गोणी घेऊन तो निघुन गेला.
या पैशांची चोरी साईनाथ पंढरीनाथ चौधरी (रा.मराठा मंगल कार्यालय, चाळीसगाव) याने केल्याचे पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. साईनाथ याला कंपनीने कामावरून काढून टाकले असताना त्याने कंपनीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात साफसफाई करण्यासाठी आल्याचे वॉचमनला खोटे सांगत वॉचमनकडून चावी घेऊन कार्यालयात प्रवेश करून कार्यालयातील ऑफीसच्या कपाटात काळ्या पिशवीत ठेवलेल रोख 45 लाखांच्या रोकडसह हार्डडिस्क आणि पेन ड्राईव्ह असा 45 लाख 16 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी राजेंद्र रामसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.