We have great respect for women officers : Ajit Pawar’s clarification after viral video सोलापूर (5 सप्टेंबर 2025) : पोलिस दलातील महिला अधिकार्यांबद्दल माझ्या मनात सर्वोच्च सन्मान आणि आदर आहे. त्यांच्या कामात हस्तक्षेप करण्याचा माझा उद्देश नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

सोलापूर जिल्ह्यात महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा यांच्या सोबत बोलताना अजित पवार यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांना या बाबत खुलासा करण्याची वेळ आली आहे.
काय म्हटले अजित पवार ?
अजित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘सोलापूर जिल्ह्यातील पोलिस अधिकार्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलिस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणार्या महिला अधिकार्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.’
नेमके प्रकरण काय?
सोलापूरमध्ये करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून जोरदार वाद झाला. प्रत्यक्षात, डीएसपी अंजली कृष्णा रस्ते बांधकामासाठी बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी माढा तालुक्यातील कुर्डू गावात पोहोचल्या होत्या. गावकरी आणि घटनास्थळी असलेल्या अधिकार्यामध्ये वाद झाला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट फोन करून डीएसपी अंजली कृष्णा यांना फोन दिला. या संदर्भात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने थेट अजित पवार यांना फोन केल्याने हा गोंधळ निर्माण झाला. या सर्व प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. यावरुन अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे.
कुर्डू या गावात रस्त्यांच्या अभावी येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येथील ग्रामस्थांनी पाणंद रस्त्यामध्ये गावच्या रस्त्याचे काम सुरू केले होते आणि त्यासाठी मुरूम उपसला जात होता. या कामासाठी ग्रामपंचायतने ठराव केला असून सर्व कागदपत्रे देखील आहेत. परंतु, अचानक पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांनी येथे कारवाई केली. त्यामुळे गावकरी आणि प्रशासन असा वाद सुरू झाला. वाद आणखी चिघळू नये म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाबा जगताप यांनी थेट पवारांना फोन लाऊन दिला होता.