भुसावळ-खंडवा विस्तारीत रेल्वे लाइनचे पुनसर्व्हेक्षण करा : मंत्री रक्षा खडसे

Re-survey the Bhusawal-Khandwa extended railway line : Minister Raksha Khadse in Delhi भुसावळ (8 सप्टेंबर 2025) : भुसावळ ते खंडवा तिसर्‍या व चौथ्या रेल्वे लाईनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया थांबवून पुनर्सर्व्हेक्षणाची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. या संदर्भात शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व बाधित शेतकर्‍यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांच्यासोबत दिल्ली येथील रेल भवनात चर्चा केली.

तर शेतकर्‍यांची उपजिविका हिरावली जाणार
रेल्वे लाईनसाठी निंभोरा बुद्रुक, साकरी, मन्यारखेडा, जाडगाव, फुलगाव, अंजनसोडा, कठोरा बुद्रुक व गहुखेडा या नऊ गावातील जमीन संपादन प्रक्रिया सुरू आहे. संपादित होणार्‍या जमीनी सुपीक असल्याने शेतकर्‍यांच्या उपजिविकेचे साधन हिरावले जाणार आहे. जमिनीचे व शिवाराचे दोन तुकडे होऊन शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे शेतकर्‍यांचा भूमी संपादनास विरोध असल्याचे मत या वेळी मांडण्यात आले. वरणगाव, फुलगाव व 9 गावांतील शेतकर्‍यांनी यापूर्वी औष्णिक विद्युत प्रकल्प, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, महामार्ग, वेल्हाळे पाट, हतनूर धरण, वेल्हाळे तलाव, ओझरखेडा धरण आदी कामांसाठी जमिनी दिल्या आहे त्यामुळे आता संपादन नको अशी भूमिका शेतकर्‍यांची आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी शेतकर्‍यांचे प्रतिनिधी म्हणून माजी सभापती राजेंद्र साहेबराव चौधरी, पर्यावरण अभ्यासक प्रा.के.पी.चौधरी, भाजपचे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख शिवाजीराव पाटील, माजी सरपंच राजकुमार चौधरी, राहुल पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते. शेतकर्‍यांच्या वतीने अ‍ॅड.धीरेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली.