आरक्षण न दिल्यास आंदोलन नव्हे तर मुंबईचा दूधासह भाजीपाला बंद करणार : मनोज जरांगे पाटलांचा इशारा

If reservation is not given, not a protest, but a shutdown of Mumbai’s milk and vegetables: Manoj Jarange Patil’s warning मुंबई (8 सप्टेंबर 2025) : आम्हाला सरकारने आरक्षण दिले नाही, तर मुंबईकरांना होणारा दूध आणि भाजीपाला पुरवठा थांबवण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. हे सर्व बंद केल्यावर मुंबईकर काय वाळू खाणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात पाच दिवस उपोषण केले होते. यानंतर सरकारने नमते घेत हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढला. या उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. उपचारानंतर ते आज त्यांच्या गावी अंतरवाली सराटीत दाखल झाले. सायंकाळी त्यांनी बीड जिल्ह्यातील नारायण गडावर भेट दिली. यावेळी गुलाल उधळीत त्यांचे स्वागत करण्यात आले. गडावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सरकारला उपरोक्त इशारा दिला.

नेमके काय म्हणाले मनोज जरांगे?
जर आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही मुंबईकरांचा भाजीपाला, दूध बंद करू अशी धमकी मनोज जरांगे यांनी दिली आहे. तसेच हे बंद झाले की मुंबईकर काय वाळू खाणार का? असाही सवाल त्यांनी विचारला आहे. शिवाय आता उपोषण करणार नाही, रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

सरकारने चूक केली, तर सुधारित जीआर काढावा लागेल
सरकारने काढलेल्या नवीन जीआरबद्दल बोलताना जरांगे म्हणाले, या निर्णयामुळे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा होणार आहे. या जीआरमध्ये काही त्रृटी आढळल्यास, सरकारला सुधारित जीआर काढावा लागेल, असे आम्ही आधीच मान्य करून घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘मी खचणार नाही, काही चूक झाली तर आणखी लढा द्यायला तयार आहे’, असेही ते म्हणाले.