Married woman commits suicide in Jalgaon after being harassed for four months जळगाव (11 सप्टेंबर 2025) : अवघ्या चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या जळगावच्या सुंदरमोती नगराततील मयुरी गौरव ठोसर (23) या विवाहितेने कौटुंबिक छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवार, 10 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. दरम्यान, सासरच्या आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा घेत नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेतला आहे.

काय घडले विवाहितसोबत ?
बुलढाणा जिल्ह्यातील पडाळी येथील मूळ रहिवासी असलेल्या मयुरीचा विवाह 10 मे 2025 रोजी जळगावातील गौरव ठोसरसोबत झालाफ लग्नानंतर काही दिवसांतच तिचा छळ सुरू झाला. सासरच्या मंडळींकडून छोट्या-छोट्या गोष्टींवरून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला तर पैशांची मागणीही केली जात होती. मयुरीचा पती गौरव हादेखील तिला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचं तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी सांगितलं. या त्रासाला कंटाळून मयुरीने तिच्या आई-वडिलांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी काही पैसे देऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण काही दिवसांनी पुन्हा छळ सुरू झाला.
वाढदिवस साजरा झाला आणि दुसर्याच दिवशी दुर्दैवी अंत
मयुरीचा वाढदिवस 9 सप्टेंबर रोजी होता. तिच्या भावाने वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला पैसे दिले होते आणि तो साजराही झाला होता. वाढदिवसाच्या दुसर्याच दिवशी, 10 सप्टेंबर रोजी दुपारी चार 4 वाजता घरात कुणी नसताना मयुरीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
न्याय मिळेपर्यंत माघार नाही, नातेवाईकांचा आक्रोश
या घटनेची माहिती मयुरीचे वडील भगवान बुडूकले यांना मिळताच, ते कुटुंबासह 11 सप्टेंबर रोजी जळगावात दाखल झाले. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर मयुरीची आई, वडील आणि भाऊ यांनी प्रचंड आक्रोश केला. आपल्या मुलीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप करत त्यांनी पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.