वरणगावातील विविध नागरी समस्या सोडवा : वरणगावात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

Stray dogs roaming freely in Varangaon ; Angry Shiv Sainiks protest for an hour in the Chief Minister’s office वरणगाव, ता.भुसावळ (15 सप्टेंबर 2025) : वरणगाव शहरात काही दिवसांपासून मोकाट भटक्या कुत्र्यांचा उच्छादामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या मागे पडत जाऊन चावा घेण्याचे प्रकार वाढले आहे. विविध भागात गटार काढणारे, घंटागाडी वेळेवर येत नसल्याने आणि कॉलनी आणि पवन नगर या भागात काटेरी झूडपे वाढल्याने पायी चालणे कठीण झाले आहे. अशा विविध नागरी समस्यांमुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याने सोमवारी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत शिवसेनेतर्फे एक तास वरणगाव नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन राऊत यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. नागरी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्याने या ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

अशा आंदोलकांच्या मागण्या
मुख्याधिकारी सचिन राऊत त्यांना दिलेल्या नमूद करण्यात आले आहे की, शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट भटके कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. हे कुत्रे नागरिकांना चावादेखील घेत आहे. शहरातील भोगावती नदीपात्र, लोहार गल्ली, मटन मार्केट, गांधी चौक, सावकार गल्ली, जुनी भाजी साथ, मच्छी मार्केट, मोठी होळी, बस स्थानक या भागात मोकाट कुत्रे झुंडीच्या झुंडीने एकत्र फिरतात. रस्त्याने पायदळ जाणारे किंवा दुचाकी स्वार यांच्या अंगावर भटके मोकाट कुत्रे धावून जातात. सकाळी शाळकरी विद्यार्थी शिकवणी क्लाससाठी गावातून बसस्थानकाकडे येतात तेव्हा हे रस्त्यावर उभे असलेले कुत्रे त्यांच्या अंगावर धावून जातात. या भीतीमुळे विद्यार्थी घाबरून परत सुटतात. अशावेळी विद्यार्थांचा अपघात होवू शकतो तसेच गटार काढणारे कर्मचारी महिलांशी अरेरावीची भाषा बोलतात.

कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात
घंटागाडी वेळेवर येत नाही, साचलेल्या कचर्‍यामुळे दुर्गंधी पसरते. तसेच कॉलनी व पवन नगर या भागात झाडे झूडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने साप विंचू अशा विषारी प्राण्यामुळे नागरिक, मुले घराबाहेर निघत नसल्याचेही दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व समस्या कधी सोडवणार या मागणीसाठी मुख्याधिकारी यांच्या दालनात एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुख्याधिकारी यांच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे घेऊन निवेदन देण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुळे, हिप्पी शेठ, भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष माळी, जिल्हा उपसंघटक निलेश सुरडकर, भुसावळ तालुका संघटक सुरेश चौधरी, शहरप्रमुख दुर्गेश बेदरकर, उपशहरप्रमुख राम शेटे, माजी ग्रामपंचायत सदस्य विलास वंजारी, नरेंद्र मोरे, नितीन देशमुख, विष्णू राणे, युवा सेना उपशहरप्रमुख पंकज पाटील, फिरोज खाटीक यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..