भरधाव ट्रेलर कारवर धडकला : जळगावच्या विवाहितेचा मृत्यू

Married woman returning to Jalgawi after meeting her son dies in car accident जळगाव (16 सप्टेंबर 2025): मुलाला भेटून जळगावकडे परतणार्‍या विवाहितेचा कार अपघातात मृत्यू झाला. मिताली सुभाष पाटील (58, रा.विनोबा नगर, जळगाव) असे विवाहितेचे नाव असून अपघातात तर त्यांचे पती सुभाष राजाराम पाटील (60) व कार चालक योगेश बारी (35, रा.शिरसोली, ता. जळगाव) हे जखमी झाले. हा अपघात सोमवार, 15 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता अजिंठा घाटाच्या पायथ्याशी झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

कसा घडला अपघात ?
निवृत्त कृषी अधिकारी सुभाष पाटील व मिताली पाटील हे चालक योगेश बारी याच्यासह कार क्रमांक (एम.एच.03 ए.डब्ल्यू.2661)ने पुणे येथे मुलाला भेटण्यासाठी गेले होते. तेथून ते सोमवार, 15 सप्टेंबर रोजी जळगाव येथे घरी परतत असताना रात्री आठ वाजता अजिंठा घाट उतरल्यानंतर टी पॉईंट नजीक मागून येणारा ट्रेलर (एम.एच.21 बी.वाय.4916) वरील चालकाचे नियंत्रण सुटले व तो थेट कारवर येऊन धडकले. कार या ट्रेलरच्या खाली दबून तिचा चक्काचूर झाला.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रेलर खालून कार काढण्यात आली व कारमध्ये अडकलेल्या तिघांनाही जळगाव येथे आणण्यात आले. यामध्ये मिताली पाटील यांचा मृत्यू झाला तर सुभाष पाटील व योगेश बारी हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद नोंद करण्यात आली.