Lawyer beaten up in court premises in Bhusawal भुसावळ (17 सप्टेंबर 2025) भुसावळ शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फी मागितल्याच्या कारणावरून एका वकिलाला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. न्यायालय परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर संशयीत मात्र पसार झाला.

काय घडले वकिलासोबत ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विवेक केशव आवारे (42, रा.फेकरी, भुसावळ) हे वकिली व्यवसाय करतात. सोमवार, 15 सप्टेंबर रोजी दुपारी 1.15 वाजेच्या सुमारास आवारे हे कोर्टातील रुम नं.103 जवळ असताना धनंजय पंडित पाटील (रा.जुना सातारा, भुसावळ) हा तेथे आला. त्याने वकिलांना ना हरकत पत्र द्यावे, अशी मागणी केली.त्यावर आवारे यांनी राहिलेली फी भरावी, त्यानंतर पत्र दिले जाईल, असे सांगितल्याने पाटील संतापला.
त्याने फिर्यादी वकिलाला शिविगाळ करत कॉलर पकडून दमदाटी केली.इतकेच नव्हे तर हरामखोरा, मला ना हरकत पत्र लिहून दे, नाही तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली. त्यानंतर त्याने आवारे यांच्या कानाजवळ मारहाण करून पोटात गुद्दा मारल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास शहर पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अब्दुल रज्जाक खान करीत आहेत.