मनपा निवडणूक : आरक्षण मुद्यावरून मध्यरात्रीपर्यंत मुख्यमंत्र्यांची बैठक

CM’s scrutiny of municipal elections : Tensions rise till midnight छत्रपती संभाजीनगर (18 सप्टेंबर 2025) : आगामी काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या दृष्टीने मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी मंगळवारी रात्री उशिरा दाखल झाले. शहरातील रामा हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. भाजपचे पदाधिकारी, मंत्री, आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत फडणवीस यांना भेटणार्‍यांची रीघ लागली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत फडणवीसांनी चाचपणी केली.

शिवसेना विभाजनानंतर पहिलीच निवडणूक
शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपने गांभीर्याने घेतल्या आहेत. विशेष म्हणजे सध्या राज्यभरात गाजत असलेल्या मराठा, ओबीसी, बंजारा यासह इतर आंदोलनाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो याबाबतदेखील सखोल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मनपात भाजप 80 जागा स्वबळावर लढू शकतो यासंबंधीची खात्री पदाधिकार्‍यांनी फडणवीसांना दिली. शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्याशी फडणवीस यांनी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शहरात सुरू असलेल्या संघटनात्मक कामांची माहितीही देण्यात आली. या कामाच्या बळावर कितपत मजल मारता येईल याचा कानोसा घेण्यात आला. जनतेत राहा असा सल्ला फडणवीसांनी पदाधिकार्‍यांना दिला.

रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या पदाधिकार्‍यासोबत चर्चा करून त्यांना आगामी निवडणुकीसाठी कानमंत्र दिले. हे कानमंत्र घेऊन मंत्री त्यांच्या जिल्ह्यात निघून गेले.