ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी निघालेल्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवा : ओबीसी मोर्चात एल्गार

Cancel Hyderabad Gazetteer GR; OBCs march हिंगोली (18 सप्टेंबर 2025) : सकल ओबीसी समााजाच्या वतीने बुधवारी कळमनुरीत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या वेळी मराठवाड्यातून ओबोसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी निघालेल्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवा, असे आवाह ओबीसी मोर्चात करण्यात आले.

विराट मोर्चात यांचा सहभाग
कळमनुरी येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून काढण्यात आलेल्या मोर्चात ओबीसी नेेते प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते यांच्यासह सकल ओबीसी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

हैदराबाद अध्यादेश रद्द करावा
मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आल्यानंतर प्रा. हाके यांनी मार्गदर्शन केले. शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियरबाबत काढलेला अध्यादेश रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. सरकारवर तसेच विरोधी पक्षावरही टीका करण्यात आली. ओबीसी आरक्षण संपविण्यासाठी निघालेल्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. राज्यातील ओबीसी समाजाने एकत्र येऊन आरक्षण वाचविण्याची लढाई लढली पाहिजे.

ओबीसी समाज धडा शिकवणार : प्रा. हाके
राज्यामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वितरित करून लोकप्रतिनिधी, सरकाराला मराठा समाजाच्या मतांची काळजी असेल तर यापुढे ओबीसी समाज त्यांना धडा शिकवेल, असा इशारा ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांनी दिला.

हैदराबाद गॅझेटियरचा अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी यापुढे तीव्र आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व ओबीसी समाजाने एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, या वेळी मोर्चात सहभागी झालेल्या इतर नेत्यांची भाषणे झाली. त्यांनीही सरकारने काढलेला हा जीआर तातडीने रद्द करावा, अशी मागणीही या वेळी केली.