MNS’ unique protest in Jalgaon against the garbage collection center in front of ITI! जळगाव (18 सप्टेंबर 2025) : जळगावातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या कचरा कचरा संकलन केंद्रामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन केले. या कचरा संकलन केंद्राच्या विरोधात विद्यार्थी आणि मनसे कार्यकर्त्यांनी मानवी साखळी तयार करून प्रशासनाचे लक्ष वेधले. वारंवार निवेदन देऊनही दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले.

आरोग्य धोक्यात; विद्यार्थ्यांचे जेवणही असुरक्षित
आयटीआयच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेला हा कचरा डेपो विद्यार्थ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. डेपोच्या दुर्गंधीमुळे आणि कचर्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. विशेषतः शेजारी असलेल्या कॅन्टीनमध्ये जेवण करताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात, कारण वार्यामुळे कचरा आणि घाण उडून थेट जेवणावर येते. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट होते, कारण दुर्गंधी असह्य होते. या सततच्या त्रासामुळेच विद्यार्थ्यांनी मनसेच्या साथीने आंदोलनाचा पवित्रा घेतला.
प्रशासनाचे आश्वासन ; दहा दिवसांत तोडगा काढण्याचे वचन
आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर आणि मनपाचे आरोग्य अभियंता उदय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आणि यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. उदय पाटील यांनी सांगितले की, नवीन जागा मिळेपर्यंत हा कचरा डेपो कापडी आच्छादनाने बंद केला जाईल. तसेच, येथे जमा झालेला कचरा त्वरित उचलून मुख्य डेपोमध्ये हलवण्यात येईल. महानगरपालिका प्रशासनाने मनसे पदाधिकार्यांसह प्राचार्यांना पुढील दहा दिवसांत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
मनसेच्या खांद्याला खांदा लावून 400 विद्यार्थी सहभागी
या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, किरण तळेले, राजेंद्र निकम, चेतन पवार, दीपक राठोड यांच्यासह आयटीआयमधील सुमारे 300 ते 400 विद्यार्थी आणि अनेक शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. मनसेच्या या भूमिकेचे विद्यार्थ्यांकडून कौतुक होत आहे. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी दहा दिवसांत तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.