Farmers’ public outcry : Grand march in Jalgaon under the leadership of Bachchu Kadu जळगाव (18 सप्टेंबर 2025) : केळी आणि कापसाला योग्य भाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहरात बुधवार, 17 सप्टेंबर रोजी भव्य शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवतीर्थ मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करत शेतकर्यांच्या प्रश्नांवरून हल्लाबोल केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्याच दिवशी हा मोर्चा काढण्यात आल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयाचा दरवाजा तोडून प्रवेश
जळगावात निघालेल्या या मोर्चाने अत्यंत आक्रमक रूप धारण केले. आंदोलक शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारण्याची मागणी केली. मात्र, ही मागणी मान्य न झाल्याने शेतकरी अधिकच संतप्त झाले. त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी दालनाच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर, प्रशासनाने समजूत घातल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
सत्ताधार्यांवर विश्वासघाताचा आरोप
या आंदोलनात सहभागी झालेले माजी खासदार उन्मेष पाटील आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते गुलाबराव वाघ यांनीही केंद्र आणि राज्यातील सत्ताधार्यांवर शेतकर्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. सत्ताधार्यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज बळीराजा हवालदिल झाला आहे. म्हणूनच पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशीच शेतकर्यांचा जनआक्रोश रस्त्यावर दिसत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शासनाने शेतकर्यांच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष द्यावे आणि त्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
केळी आणि कापूस उत्पादक शेतकर्यांची व्यथा
जळगाव जिल्हा हा केळी आणि कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. मात्र, गेल्या काही काळापासून या दोन्ही पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्च वाढत असताना, बाजारभाव मात्र स्थिर किंवा घसरत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या मोर्चातून शेतकर्यांनी आपली ही व्यथा शासनासमोर मांडली आणि त्वरित योग्य भाव जाहीर करण्याची मागणी केली.