Retired man in Amalner cheated of Rs. 5.5 lakhs जळगाव (18 सप्टेंबर 2025) : अमळनेर शहरातील रहिवासी व सेवानिवृत्त एस. टी. महामंडळाच्या कर्मचार्याला जादा नफा मिळवण्याच्या आमिषाने पा लाख 60 हजार 683 रुपयांचा गंडा घालण्यात आला. जळगाव सायबर पोलिसात बुधवार, 17 सप्टेंबर रोजी दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण ?
प्रकाश जानकीराम बडगुजर ( 79, रा.अमळनेर) हे ज्येष्ठ नागरिक असून ते एस.टी.महामंडळातून सेवानिवृत्त झाले आहेत. 1 मे ते 7 ऑगस्ट 2025 पावेतो त्यांच्या व्हॉट्सअॅप मोबाइल क्रमांकावर अनोळखी रिधव वर्मा तसेच आकाश सिंग यांनी संपर्क साधला. क्वॉन्टा पल्स या कंपनीत गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल, असे आमिष या दोघांनी दाखवित त्यांच्याशी संपर्क वाढविण्यास सुरुवात केली.
आम्ही आपल्या पैश्यांची काळजी घेतो, या पैश्यांचा जास्त मोबदला मिळेल, असे सांगत या सायबर भामट्याने निवृत्त कर्मचार्यावर जाळे फेकले. तक्रारदार यांनी सुरुवातीला काही रक्कमेची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर नफा होऊन एकूण 18 लाख 85 हजार 316 रुपये कंपनीच्या अॅपमध्ये जमा झाल्याचे ऑनलाईन मोबाईलमध्ये दाखवत तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यात आला.
निवृत्त कर्मचार्याकडून संशयितांनी वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यात ऑनलाईन एकूण पाच लाख 60 हजार 683 रुपये स्विकारले. त्यानंतर या संशयितांनी निवृत्त कर्मचार्याकडे पाठ फिरविली. तक्रारदार यांनी या दोघांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अथवा मूळ रक्कमही परत केली नाही. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तक्रारदार यांनी सायबर पोलिस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.