कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची हत्या ; मुंदखेड्यात खळबळ

Husband kills wife over family dispute ; stir in Mundkheda जामनेर (18 सप्टेंबर 2025) : कौटूंबिक वाद वाढत गेल्यानंतर पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील मुंदखेडा गावात गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता घडली. अनिता उर्फ मिनाबाई बाळु भील (मोरे, 40, रा.मुंदखेडा, ता.जामनेर) असे मयत विवाहितेचे नाव आहे तर संशयीत व पती बाळू भील यास अटक रकण्यात आली.

कौटूंबिक वाद विवाहितेच्या जीवावर
सूत्रांच्या माहितीनुसार, विवाहिता मीनाबाई या पती, दोन मुले व दोन मुलींसह मुंदखेडा गावात वास्तव्याला होती. पती बाळू विश्वनाथ भील ( 45) हा हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतो. गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी अनिता घरकाम करीत असताना आरोपी बाळू भिल याने पत्नीशी जुना वाद उकरून काढला.

चाकूचे वार अन् विवाहितेचा मृत्यू
यावेळी पतीने धारदार चाकूने पत्नी अनितावर सपासप वार करून तिची हत्या केली. गंभीर जखमी अवस्थेत विवाहितेला तत्काळ जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचार सुरू होण्याआधीच तिचा मृत्यू झाला.

पोलिसांची घटनास्थळी धाव
जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार हे आपल्या कर्मचार्‍यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. अवघ्या काही तासांतच संशयित आरोपी पती बाळु भीलला अटक करण्यात आली. खुनाच्या घटनेमुळे मुंदखेडा गावात खळबळ उडाली. आईच्या खुनामुळे चिमुकले आईच्या प्रेमाला मुकली आहेत. आरोपी पतीविरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला. तपास जामनेर निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पाटील करीत आहेत.