पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्तांच्या दुःखावर पालकमंत्र्यांची मायेची फुंकर : लवकरच भरपाईचे सुतोवाच

नुकसान झालेल्या गावांचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Heavy rains in Pachora taluka : Help for the affected soon : Guardian Minister Gulabrao Patil जळगाव (18 सप्टेंबर 2025) : पाचोरा तालुक्यातील, वाडी शेवाळे, शिंदाड, सावरा पिंपरी, सातगाव डोंगरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे येथील शेती पिकांचे व घरांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना शासनातर्फे लवकरच मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. पाचोरा व जामनेर तालुक्यातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या गावांची पाहणी त्यांनी गुरुवारी केली. यावेळी शेतकर्‍यांशी संवाद साधताना पालकमंत्री बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी त्यांच्या समवेत आमदार किशोर पाटील, प्रांताधिकारी भूषण अहिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.डी.पाटील, रावसाहेब पाटील,आदी उपस्थित होते.

शेती पिकांचे मोठे नुकसान : पालकमंत्री
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, या परिसरातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही भागातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरांचे सुद्धा नुकसान झाले आहे. पुरामुळे अनेक गावात गुरे दगावली असून पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. स्थानिक व्यापार्‍यांच्या मालाचे व दुकानाचे सुद्धा नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त भागात महसूल व कृषी विभागाच्या मदतीने पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. उर्वरित भागात तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणार
शेतकर्‍यांच्या सर्व अडचणी समजून घेऊन त्यांना मदत मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य संबंधित अधिकार्‍यांनी करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी
पाचोरा तालुक्यातील शिंदाड, सार्वे बु.॥, सातगाव या गावात अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी ते म्हणाले, शासन पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. आपणास जास्तीत*जास्त मदत उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन,असे त्यांनी यावेळी सांगितले.

पाचोरा तालुक्यातील शिंदाड या गावात थेट बांधावर जाऊन शेतातील संपूर्ण माती व पीक वाहून गेलेल्या शेतांची पाहणी करताना ते स्वतः भावूक झाले.

या पाहणी दौर्‍या दरम्यान तालुक्यातील महसूल सार्वजनिक बांधकाम आरोग्य आदी विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.