विद्यार्थ्यांवर विद्यालयातच चाकूहल्ला : भुसावळात खळबळ

Bhusawal shaken: Four students attacked with knives at Shri Sant Gadgebaba Vidyalaya over a girl’s teasing भुसावळ (18 सप्टेंबर 2025) : शहरात गुन्हेगारी बोकाळली असतानाच आता थेट मुलीच्या छेडखानीवरून चौघा विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी उच्च विद्यालयात घडली. या घटनेत बी.ए. सेकंड वर्षाचे चार विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

काय घडले भुसावळात ?
भुसावळातीन श्री संत गाडगेबाबा हिंदी उच्च विद्यालयाच्या आवारात संशयीतांनी साहिल कुरेशी, प्रणय निहारे, प्रथमेश बहुगुणे, आदिल खान यांच्यावर चाकूने हल्ला केला. ही घटना गुरुवारी दुपारी 12 वाजता घडली. जखमींवर ग्रामीण रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शाळेतील वातावरण तणावपूर्ण बनले तर संशयीत मात्र पसार झाले. चाकू हल्ल्याची घटना शाळेतील सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. दरम्यान, नेमकी घटना का व कशी घडली? या संदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने संशयीतांची नावे कळू शकली नाहीत.

विद्येचे ज्ञान मंदिरही असुरक्षित !
भुसावळातील गुन्हेगारी नवीन नाही तर खूनसत्र, चोर्‍या, हाणामार्‍या हे प्रकारही शहरवासीयांना नवीन नाही मात्र आता थेट सरस्वतीच्या ज्ञान मंदिरात गुन्हेगारी कृत्य घडू लागल्यानंतर पालकवर्गात प्रचंड भीती पसरली आहे. पोलिस प्रशासनाने मरगळ झटकून गुन्हेगारांना अद्दल घडवावी, अशी माफक अपेक्षा सुज्ञ भुसावळकर व्यक्त करीत आहेत.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
डी.वाय.एस.पी.संदीप गावीत, बाजारपेठ सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, सोपान पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली.