सीसीएमपी डॉक्टरांच्या नोंदणीला विरोध : आयएमए संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद

IMA strike: OPDs doubled in Bhusawal Rural Hospital, Municipal Hospital भुसावळ (19 सप्टेंबर 2025) :  इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) सीसीएमपी डॉक्टरांच्या नोंदणीला विरोध करीत शहरातील 83 हॉस्पीटलांनी संपात सहभागी होत बंद पाळला. यामुळे ग्रामीण रुग्णालय, पालिका दवाखाना येथे दररोज पेक्षा दुपट्टीने ओपीडी झाली. ग्रामीण रूग्णालयात दररोज 100 रुग्णांची तपासणी होते तर तेथे गुरूवारी 200 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी झाली तर पालिका दवाखान्यात सुध्दा 200 पेक्षा जास्त रुग्णांची ओपीडीत तपासणी करण्यात आली.

प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी थांबवावी, अन्यथा आरोग्य सेवा ठप्प करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन आयएमए भुसावळ शाखेचे अध्यक्ष डॉ. विकास कोळंबे यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांनी सादर केले. निवेदनात नमूद केले आहे की, एमबीबीएस अभ्यासक्रम हा 5.5 वर्षांचा असून त्यात 19 विषयांचा सखोल अभ्यास,प्रत्यक्ष क्लिनिकल अनुभव आणि एक वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप असते. दुसरीकडे सीसीएमपी हा केवळ एक वर्षाचा अल्पकालीन कोर्स असून त्यामध्ये वैद्यकीय शिक्षणाची सखोलता आणि प्रात्यक्षिक अनुभव नाही. अशा अल्प प्रशिक्षण घेतलेल्या डॉक्टरांनी रुग्णांना उपचार दिल्यास चुकीचे निदान, औषधांचा दुष्परिणाम तसेच मृत्यूची शक्यता वाढू शकते,असा इशारा डॉक्टरांनी दिला. आयएमएचे म्हणणे आहे की,सीसीएमपी डॉक्टरांना नोंदणी दिल्यास दोन पद्धतींची दुहेरी प्रणाली तयार होईल.यामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण होऊन रुग्णांचा विश्वास डळमळीत होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अभ्यासक्रम म्हणून एमबीबीएसलाच मान्यता आहे, त्यामुळे सीसीएमपी कोर्स मान्य करून नोंदणी देणे हे वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेच्या प्रतिमेला धक्का देणारे पाऊल ठरेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल
गुरूवारी शहरातील हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी ग्रामीण भागातून उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना शहरातील हॉस्पीटल बंद असल्याची माहिती नसल्याने रूग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ग्रामीण भागातून आलेल्या रूग्णांना लहान दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावे लागले. तर काही रूग्णांना रिक्षा करून जळगाव रोडवरील ग्रामीण रुग्णालयात धाव घ्यावी लागली. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. काही जणांनी पालिकेच्या दवाखान्यात जाऊन उपचार करून घेतले.

ओपीडीत झाली वाढ
शहरातील हॉस्पीटल बंद असल्याने ग्रामीण रूग्णालय, पालिका दवाखाना येथे ओपीडीत तपासणीसाठी रूग्णांची गर्दी झाली होती. पालिका दवाखान्यात दररोज 170 पेक्षा जास्त रूग्णांची तपासणी होते, तेथे गुरूवारी 200 पेक्षा जास्त रूग्णांची तपासणी करण्यात आली. तर ग्रामीण रूग्णालयात दररोज 100 रूग्णांची तपासणी होते, तेथे 200 पर्यत रूग्णांची तपासणी करण्यात आली.

ग्रामीण रूग्णालयात 18 रूग्णांवर उपचार
येथील जळगाव रोडवरील ग्रामीण रूग्णालयात 18 रूग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे, येथे ऑक्सीजन सुविधा सुध्दा उपलब्ध होती. सर्व डॉक्टर, कर्मचारी यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या. सकाळपासून संध्याकाळपर्यत रूग्णांची तपासणी सुरू होती. असे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कुरकुरे यांनी सांगितले.

हॉस्पीटलाबाहेर फलक
शहरातील नेहमीच गजबजलेल्या हॉस्पीटलच्या बाहेर फलकाद्वारे सूचना लावण्यात आली होती, त्यात हॉस्पीटल बंद असल्याचे सांगण्यात आले, यामुळे फलक सूचना पाहूनच रूग्ण निघून गेले होते. अनेक हॉस्पीटलच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात होते. त्यांनी आलेल्या रूग्णांना हॉस्पीटल शुक्रवारी सकाळपर्यत बंद असल्याचे सांगितले.

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन
सरकारने आयएमएच्या मागण्या मान्य न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, यावेळी 24 तास बंदचे आंदोलन होते, भविष्यात त्यात वाढ होऊ शकते, एक दिवसांपेक्षा जास्त दिवस सुध्दा हॉस्पीटल बंद राहू शकतील, प्रांतांना निवेदन दिले आहे, सरकारने मागण्यांचा विचार करावा, असे आयएमए अध्यक्ष डॉ.विकास कोळंबे म्हणाले.