डी.एल.हिंदी कॉलेज परिसरात चाकूहल्ला : भुसावळातील तरुणाला बेड्या

Knife attack at DL Hindi School in Bhusawal : Two cases registered under POCSO including molestation भुसावळ (20 सप्टेंबर 2025) : शहरातील डी.एल. हिंदी हायस्कूल-कॉलेज परिसरात गुरुवार, 18 सकाळी तीन सराईतांनी विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला करून चौघांना गंभीर जखमी केले होते. या घटनेमागे 17 वर्षीय विद्यार्थिनी व तिच्या मैत्रिणींना शिट्ट्या मारून छेडछाड करण्यात आल्यानंतर जाब विचारल्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता. दोन्ही प्रकरणात भुसावळ बाजारपेठ पोलिसात ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून एक पोस्कोचा गुन्हा करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयीताला अटक केली आहे.

काय घडले भुसावळ शहरात ?
गुरुवारी सकाळी 11 वाजता फिर्यादी आदिल खान मुकीम खान (18, रा. शिवाजीनगर, भुसावळ) व त्याचे मित्र प्रणय निहारे, भावेश बहिरोणे, शेख साहील कुरेशी व निखिल पाटील हे असाईनमेंट जमा करण्यासाठी कॉलेज परिसरात गेले होते. त्याचवेळी संशयीत साहील उर्फ ढोल्या, नावेद शेख उर्फ नावेद पटेल व सोहेल कुरेशी यांनी अचानक त्यांच्यावर चाकू हल्ला केला. प्रथम प्रणय निहारे याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यास वाचवण्यासाठी पुढे आलेल्या मित्रांवर साहील ढोल्याने चाकूने वार करून आदिल खानसह चौघांना गंभीर जखमी केले. शाळेच्या आवारात गोंधळ घालून संशयीतांनी दहशत निर्माण केली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाआहे.

दुसर्‍या घटनेत विद्यार्थिनीची छेडछाड
गुरुवारी सकाळी डी.एल.हिंदी कॉलेजच्या प्रांगणात 17 वर्षीय विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीसोबत बॅडमिंटन खेळत असताना प्रणय निहारे, आदिल खान व भावेश बहिरोणे यांनी शिट्ट्या मारून अश्लील हावभाव व कमेंट्स केल्या. या प्रकारास विरोध करण्यासाठी विद्यार्थिनीचा नातेवाईक सोहेल व तिच्या भावाचा मित्र साहील शेख मकसूद पुढे आले असता, संशयीतांनी त्यांनाही मारहाण केली.

या घटनेची नोंद बाजारपेठ पोलिस ठाण्यात झाली असून पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. सलग दोन गंभीर घटना घडल्याने कॉलेज परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही प्रकरणात पोलिसांकडून संशयीताविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपास बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन पाटील, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी साहिल कुरेशी याला अटक केली आहे.

महाविद्यालयात गुंडागर्दी खपवून घेणार नाही
महाविद्यालयाच्या आवारात जर गुंडागर्दी केली तर ती खपवून घेतली जाणार नाही, थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, शैक्षणिक वातावरण महाविद्यालयाच्या परिसरात राहण्यासाठी प्रशासन कटीबद्ध असल्याचे प्राचार्य रमेश जोशी म्हणाले.