35 हजारांची लाच भोवली : मालेगाव तालुका पोलिस ठाण्याचा हवालदार एसीबीच्या जाळ्यात

Accepting a bribe of 35 thousand at the police station : Constable in Malegaon handcuffed by ACB भुसावळ (21 सप्टेंबर 2025) : गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासह लवकर जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात 35 हजारांची लाच पोलिस ठाण्यात स्वीकारणार्‍या हवालदाराला नाशिक एसीबीने अटक केली आहे. नयन भगीरथसिंग परदेशी (35) असे अटकेतील आरोपी हवालदाराचे नाव असून ते मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराचा भाचा मुश्रीफ शेख असलम यांच्याविरोधात मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात लवकर जामीन मिळवून देण्यासह तपासात मदत करण्यासाठी 35 हजारांची लाच हवालदार नयन भगीरथसिंग परदेशी यांनी मागितली होती व त्यानुसार पडताळणी करून शनिवार, 20 रोजी सापळा रचण्यात आला. ठरल्यानंतर लाचेची रक्कम हवालदाराने मालेगाव तालुका पोलिस ठाण्यातील संगणक कक्षात स्वीकारली व लाच स्वीकारल्याचा इशारा मिळताच दबा धरून असलेल्या पथकाने आरोपी हवालदाराला अटक केली. या कारवाईने पोलिस ठाण्यात प्रचंड खळबळ उडाली. आरोपीविरोधात त्याच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीच्या पोलिस निरीक्षक पूनम केदार, हवालदार गणेश निंबाळकर, अंमलदार नितीन नेटारे, नाईक परशुराम जाधव आदींच्या पथकाने यशस्वी केला.