सहकारी महिला डॉक्टरांचा विनयभंग : जळगाव महापालिकेचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय घोलपला अटक

Jalgaon Municipal Corporation Chief Medical Officer Dr. Vijay Gholap arrested for molesting fellow female doctor जळगाव (21 सप्टेंबर 2025) : सहकारी महिला डॉक्टरांकडे शरीर सुखाची मागणी करीत तिचा विनयभंग करणार्‍या जळगाव महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना जळगाव शहर पोलिसांनी रविवारी दुपारी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने मनपाच्या आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी डॉ.घोलप यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
38 वर्षीय डॉक्टर महिलेने शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. महानगरपालिकेच्या शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना डॉ.घोलप यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले, अश्लील इशारे करत मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले तसेच तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला. या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ.विजय घोलप यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच त्यांना अटक केली.

डॉ.घोलपांविषयी अनेक तक्रारी
डॉ. घोलप यांच्यावर अनेक दिवसांपासून विविध तक्रारी येत होत्या. सहकारी महिलेशी गैरवर्तन केल्याचे आरोप झाल्यानंतर त्यांना महापालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती मात्र त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. याच दरम्यान, डॉ.घोलप यांच्या कार्यकाळात जन्म-मृत्यू नोंदणी विभागातही एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत नियुक्त असलेल्या एका महिलेच्या जागी तिचा पतीच कर्तव्य बजावत असल्याची माहिती उघड झाली होती. या दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेत तीन सदस्यीय चौकशी समितीने अहवाल आयुक्तांकडे सादर केला.

या अहवालानंतर, ‘विशाखा समिती’ने दिलेल्या प्राथमिक अहवालावर कारवाई करत आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी डॉ. घोलप यांना दोषी ठरवत निलंबनाचे आदेश काढल्याचे सूत्रांकडून समजते.