ममुराबादजवळ रिक्षा झाली पलटी ; 9 भाविक जखमी

Vehicle of devotees going to Shiragad Devi meets with accident : Nine injured जळगाव (23 सप्टेंबर 2025) : जळगावातील भाविक शिरागड येथे देवीच्या दर्शनासाठी जात असताना ममुराबाद गावाजवळ सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास रिक्षा पलटल्याने नऊ भाविक जखमी झाले. अपघात प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात नोंद करण्यात आली.

काय घडले भाविकांसोबत ?
जळगावातील रामेश्वर कॉलनीतील काही रहिवासी नवरात्रीनिमित्त यावल तालुक्यातील शिरागड येथे दर्शनासाठी रिक्षाने जात होते. त्यांची भरधाव रिक्षा ममुराबादजवळ अचानक पलटी झाली. या अपघातात रिक्षातील 9 भाविकांना जबर मार लागला. काहींना किरकोळ दुखापती झाल्या, तर काहींना गंभीर मार लागला.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तत्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये आशा शितोळे (48), बाळू साबळे (48), सुलाबाई माळी (60), मथुराबाई साबळे (70), ज्योती साबळे (28), द्वारकाबाई भाऊसाहेब (50), मंदाबाई साबळे (48), ओम बाळू साबळे (19) आणि धनराज माळी (23) यांचा समावेश आहे.

सर्वांची प्रकृती स्थिर असून, काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद जळगाव तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.