Will not wait for help from the Center! Chief Minister Devendra Fadnavis will provide urgent help to farmers मुंबई (23 सप्टेंबर 2025) : काही पक्षांना प्रत्येक विषयात राजकारण करण्याची इच्छा असून आपल्याला त्याल पडायचे नाही. प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली असून केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्याकडून शेतकर्यांना मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही पलटवार करीत टीका केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वच पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन आलेले आहेत. इतकेच नाही तर ते उद्यादेखील जाणार आहेत. मी स्वतः देखील काही जिल्ह्यामध्ये जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र, मला याचे राजकरण करायचे नाही. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी करणे हेच हास्यास्पद असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.
राज्य शासन करणार मदत
राज्यातील पूर परिस्थितीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला यात राजकारण करायचे नाही. मात्र, दुर्दैवाने आपल्या राज्यात प्रत्येक गोष्टीमध्ये काही पक्षांना राजकारण करायचे असते. मात्र, यामध्ये जी काही मदत करता येईल ती मदत आपण करू, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील पूर परिस्थितीवर विस्ताराने चर्चा झाली आहे. आतापर्यंत 975 मिलिमीटर पाऊस झाला आहे आणि हा सरासरीपेक्षाही 102 टक्के जास्त असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
केंद्राच्या मदतीची प्रतीक्षा नाही
एनडीआरएफ अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने आपल्याला अॅडव्हान्समध्ये पैसे दिलेले असतात. ते पैसे आपण सध्या खर्च करतोय. इतकेच नाही तर राज्य सरकारच्याही काही पैशांची गरज पडली, तर ती मदत देखील तत्काळ केली जाईल. केंद्र सरकारची मदत नक्कीच घेतली जाईल. मात्र, त्यासाठी राज्य सरकार थांबणार नाही. शेतकर्यांना तातडीची मदत करणे आवश्यक आहे. ती मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
शेतकर्यांना पैसे मिळण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा कालावधी
राज्य सरकारच्या वतीने शेतकर्यांना मदत करण्यासाठी दोन हजार 215 कोटींची मदत आतापर्यंत रिलीज करण्यात आली आहे. मात्र हे सर्व पैसे एकाच जीआरने नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या जीआरच्या माध्यमातून देण्यात येत आहे. तसेच ही प्रक्रिया अद्याप थांबलेली नाही. वाटप झाल्यानंतर देखील शेतकर्यांना पूर्ण पैसे मिळण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागेल, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. या माध्यमातून राज्यातील 31 लाख 64 हजार शेतकर्यांना मदत केली जात असल्याचे ते म्हणाले.