उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका : जाहिरातबाजी ऐवजी शेतकर्‍यांना मदत करा !

Help farmers instead of wasting money on advertisements: Uddhav Thackeray मुंबई (23 सप्टेंबर 2025) : सरकारने स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदतीचा हात द्यावा, असे टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

राऊतांची पोस्ट चर्चेत
खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची एक प्रतिक्रिया पोस्ट केली आहे. त्यात उद्धव ठाकरे म्हणतात, सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचे वैशिष्ट म्हणजे आजपर्यंत दुष्काळग्रस्त समजल्या जाणार्‍या बीड, लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांमध्ये शेतकर्‍याचे पीक पाण्यात गेलं आहे. मराठवाड्यातला शेतकरी बेसावध होता. इतक्या वर्षांपासून कधी ढगफुटी, अतिवृष्टी त्यांनी पाहिली नव्हती. नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी धाराशिव भागात एकदा गारपीट झाली होती पण आता लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप पीकं डोळ्यादेखत पाण्यात गेली आहेत.

एकही मंत्री बांधावर फिरकला नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, एकही मंत्री बांधावर फिरकलेला नाही. मराठवाड्याला सापत्न वागणूक देताय. साधं हेलिकॉप्टरने सुद्धा पूर परिस्थितीची पाहणी करायला सीएम आणि डीसीएम यांना वेळ नाही. नुसते मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन टीव्ही समोर पाहणी करण्याचे नाटक सुरू आहे आणि टेबल न्यूज तयार करणे सुरू आहे. आजची कॅबिनेट रद्द करून पूर्णपणे मराठवाड्यातल्या अतिवृष्टी संदर्भात आढावा घ्यायला पाहिजे होता. जमीन वाहून गेल्याने रब्बी धोक्यात आली आहे. गुरे-ढोरे वाहून गेले, रस्ते वाहून गेले. मराठवाड्यात शेतीला जो फटका बसला आहे त्यातून ते कसे सावरणार?

प्रथम पैसे द्या, नंतर शहानिशा करत बसा
केंद्राने किमान तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी. शेतकर्‍यांच्या खात्यात तत्काळ नुकसानीचे पैसे जमा करावे. या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये यासाठी तसे निर्देश द्यावे. शेतकर्‍यांच्या बाबतीतही पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ घालवू नका. पहिल्यांदा छान भरपाई बँक खात्यामध्ये जमा करा आणि नंतर त्याची शहानिशा करत बसा.

जुन्या निकषाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत न देता तीन हेक्टर पर्यंत मदत द्या. ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा. स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदतीचा हात द्या, असेही उद्धव ठाकरे या प्रकरणी बोलताना म्हणालेत.