वरणगाव परिसरात अतिवृष्टीने पिके पाण्यात : मंत्री संजय सावकारे यांनी केली पाहणी

Cloudburst in Varangaon area : Textile Minister Sanjay Savkare inspected and assured help भुसावळ (24 सप्टेंबर 2025) : भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरासह तळवेल, ओझरखेडा, पिंपळगाव सुसरी, दर्यापूर, कठोरा, अंजनसोंडा, हतनूर, सावतर, निंभोरा, बोहर्डी, काहूरखेडा या गावांमध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे रस्त्यांवर चार ते पाच फूट पाणी साचले असून परिणामी अनेक भागातील वाहतूक खंडित झाली आहे तर हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. झालेल्या नुकसानी संदर्भात बुधवार, 24 सप्टेंबर रोजी मंत्री संजय सावकारे यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व महसूल प्रशासनाला तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. शासनाकडून लवकरच शेतकर्‍यांना भरपाई मिळेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

भोगवतीसह लौकी नदीला पूर
मंगळवारच्या अतिवृष्टीमुळे भोगावती व लौकी या नद्यांना मोठा पूर आले आला. या परिसरातील शेतकर्‍यांचे सर्व पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

अधिकार्‍यांसह मंत्र्यांनी केली पाहणी
बुधवारी नुकसानग्रस्त परिसराची सकाळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, तहसीलदार नीता लबडे, मुख्याधिकारी सचिन राऊत, कृषी विद्यापीठाचे अधिकारी, सहा.पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यांनी प्रभावित भागाची पाहणी केली. यावेळी तत्काळ पंचनामे सुरू करून शेतकर्‍यांना मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अयोध्या नगर व परिसरात पावसाचे पाणी शिरले
मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे वरणगाव शहरातील अयोध्या नगर, श्रीराम नगर व सिद्धेश्वर नगर परिसरातील नागरिकांचे मोठे हाल झाले. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही अयोध्या नगर भागात पाणी घरामध्ये शिरले. श्रीराम नगरातील धनराज चौधरी यांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले तसेच नागेश्वर महादेव मंदिर रोडवरील महावीर कृषी केंद्रामध्ये पाणी घुसल्याने खते, बियाणे व कीटकनाशकांचे मोठे नुकसान झाले.

वीजपुरवठा खंडित : नागरिकांचे हाल
पावसामुळे शिवाजीनगर व ऑर्डनन्स फॅक्टरी, सुशील नगर येथील डीपीत बिघाड झाल्याने ते बदलण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते तसेच किरकोळ नुकसान वगळता महावितरणचे नुकसान झाले नाही, असे उपकार्यकारी अभियंता सचिन पंचबुद्धे म्हणाले.