Vinod Deshmukh, leader of Ajit Pawar group in Jalgaon, arrested at midnight जळगाव (24 सप्टेंबर 2025) : जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गटाचे नेते विनोद देशमुख यांना मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 2022 साली दाखल झालेल्या या गुन्ह्यात तब्बल दोन ते तीन वर्षांनंतर ही कारवाई झाली आहे. विनोद देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने या कारवाईला विशेष महत्व आहे.

काय घडले जळगावात ?
व्यवसायीक तथा फिर्यादी मनोज वाणी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर गंभीर आरोप केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावामुळे पोलिस आरोपींना अटक करत नाहीत, असा आरोप त्यांनी जाहीरपणे केला होता. या आरोपानंतर अवघ्या काही दिवसांतच रामानंद नगर पोलिसांनी ही कारवाई करत देशमुख यांना अटक केली आहे.
2022 चे प्रकरण
2022 मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यात विनोद देशमुख यांच्यासह इतर काही आरोपींचा समावेश होता. या प्रकरणात देशमुख यांच्यावर कार्यालयात घुसून दरोडा टाकणे आणि फिर्यादीला धमकावण्याचे आरोप आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, मात्र आरोपींना अटक होत नसल्याने पीडित व्यावसायीक नाराज होते.
पत्रकार परिषदेनंतर दबाव वाढताच कारवाई
वाणी यांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रशासनावर दबाव वाढला आणि अखेर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नेत्यावर ही कारवाई झाल्याने या प्रकरणाला आता राजकीय रंगही चढण्याची शक्यता आहे.