Rape case against police officer in Jalgaon: What is the exact case? जळगाव (24 सप्टेंबर 2025) : सोशल मिडीयातील फेसबुकवरून झालेल्या ओळखीनंतर अविवाहित असल्याचे भासवून मूळच्या पश्चिम बंगालच्या 31 वर्षीय तरुणीवर शहरातील विविध लॉजेसमध्ये तब्बल 2021 ते 2025 दरम्यान पोलिस कर्मचार्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रावेरात कार्यरत पोलिस कर्मचार्यासह त्याची पत्नी व आईविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण
मूळची पश्चिम बंगालमधील रहिवासी असलेल्या 31 वर्षीय पीडीतेशी संशयीत व जळगाव पोलिस दलातील रावेरात कार्यरत कर्मचारी नितीन कमलाकर सपकाळे (32) याची 2017 मध्ये फेसबुकद्वारे ओळख झाली व सपकाळे याने आपण अविवाहित असल्याचे भासवून तिच्याशी मैत्री केली आणि लग्नाचे आमिष दाखवले. या आश्वासनावर विश्वास ठेवून पीडित महिला अनेकदा कोलकाताहून जळगावला आली. या काळात नितीनने तिला विविध हॉटेल्समध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.
2020 मध्ये पीडित महिलेला नितीन सपकाळे विवाहित असून त्याला एक मुलगी असल्याचे समजले. तरीही नितीनने तिच्याशी पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि फसवणूक सुरूच ठेवली. 2021 ते 2025 या काळात त्याने वेळोवेळी अत्याचार केले. अखेरीस, 2025 मध्ये त्याने पीडीतेसोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.
फसवणुकीची जाणीव झाल्यावर पीडित महिलेने वकिलांच्या मदतीने मंगळवार, 23 सप्टेंबर रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या फिर्यादीनुसार, पोलिसांनी संशयित आरोपी नितीन सपकाळे, त्याची पत्नी आणि आई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची पत्नी, आई व एका मित्राने पीडीतेला मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आल्याने त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. तपास पोलिस निरीक्षक सागर शिंपी करीत आहेत.