अतिवृष्टीग्रस्त भागाची मनोज जरांगेंनी केली पाहणी : सरकारला दिला ‘हा’ इशारा

Maharashtra will shut down if farmers do not get 100 percent compensation: Manoj Jarange Patil warns the government धाराशिव (24 सप्टेंबर 2025) : सरकारने निकष न लावता जेवढे नुकसान झाले आहे, तेवढी मदत द्यावी. अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला आहे.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी
मनोज जरांगे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त चिंचपुर ढगे तसेच पिंपळगाव परिसरात भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांची व्यथा जाणून घेतली तसेच त्यांना धीर देण्याचे देखील काम त्यांनी केले. तसेच जेवढे नुकसान झाले तेवढी मदत द्यावी, अन्यथा महाराष्ट्र बंद करण्यात येईल, असा इशारा सरकारला दिला आहे. मदतीसाठी जनावरांचे मृतदेह लागतील अशा अव्यवहार्य अटी रद्द करून शेतकर्‍यांना तात्काळ 100 टक्के आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

सरकारने तत्काळ मदतकार्य सुरू करावे
पिंपळगाव येथील आत्माराम दातखिळे यांना धीर देताना म्हटले की, शेतमालाचे नुकसान, जनावरांचे मृत्यू, घरांचे झालेले नुकसान या सार्‍या गोष्टी गंभीर आहेत. सरकारने तत्काळ मदतकार्य सुरू करून शेतकर्‍यांना आधार देणे गरजेचे आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे करताना 50 टक्के, 60 टक्के असे करू नका, असे आवाहन जरांगे यांनी सरकारी अधिकार्‍यांना केले आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे देखील जरांगे यांनी सांगितले.

सर्वच पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी सरकारची मदत : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सोलापूरच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जात पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, सर्वच पीडित नागरिकांना दिवाळीपूर्वी सरकारची मदत मिळेल असे स्पष्ट केले. ते म्हणाले, काल सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा निधी जारी केला. सरकार या संदर्भात शेतकर्‍यांना मदत करेलच. पण सोबतच ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांचेही नुकसान भरून दिले जाईल. अन्नधान्याचे नुकसान झालेल्यांनाही मदत केली जाईल. कोणतेही अधिकचे निकष न लावता गरजेनुसार निकष शिथील करून नागरीक केंद्रीत मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.