बस स्थानकावर बस कंडक्टरला प्रवाशाची शिवीगाळ व मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

बस स्थानकावर बस कंडक्टरला प्रवाशाची शिवीगाळ व मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

चाळीसगाव (जि. जळगाव) : चाळीसगाव बस स्थानकावर सोमवारी सकाळी एक प्रवासी वाद घालून एस.टी. बस कंडक्टरला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. चाळीसगाव ते सूरत एसटी बसवरील कंडक्टर रवींद्र भिला तिरमली (वय ५३, रा. रावंडेनगर, मालेगाव रोड, चाळीसगाव) यांच्या तक्रारीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, तिरमली हे एमएच-२० बीआर-३००४ या चाळीसगाव–सूरत एसटी बसचे कंडक्टर असून, सोमवारी (दि. २) सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास ते चाळीसगाव एसटी स्थानकावर बसगाडीकडे जात होते. त्यावेळी एका प्रवाशाने त्यांच्याजवळ येऊन “जामनेरची बस कुठे लागते?” अशी विचारणा केली. तिरमली यांनी “माहित नाही” असे उत्तर दिल्याने त्या प्रवाशाने संताप व्यक्त करत मोठ्याने ओरडून, “तुम्ही नक्की करता तरी काय?” असे म्हटले.

तिरमली यांनी त्या प्रवाशाला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेनंतर तक्रारदार कंडक्टरने चाळीसगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

या प्रकरणी रमेश अण्णा व इतर तिघा अशा चौघांविरोधात शिवीगाळ, मारहाण आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाळीसगाव पोलीस करत आहेत.