केळी भरलेल्या ट्रकच्या धडकेत दोन तरुण ठार

केळी भरलेल्या ट्रकच्या धडकेत दोन तरुण ठार

बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील घटना

सावदा (प्रतिनिधी) : केळीने भरलेल्या आयशर ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रणगाव (ता. रावेर) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (२ जून) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात सावदा-बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील वाघोदा गावाजवळील वळणावर घडला.

मृतांची नावे नितीन धनराज कोळी आणि नितीन रामलाल कोळी (वय ४०, दोघेही रा. रणगाव, ता. रावेर) अशी आहेत. हे दोघे रावेर येथे लग्नसोहळ्यात सहभागी होऊन दुचाकीवरून घरी परतत असताना आयशर ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला. मात्र, सावधगिरीने काम करत सावदा पोलिसांनी महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील तपासणी नाक्यावर ट्रक थांबवून चालकाला ताब्यात घेतले. मृतदेहांचे शवविच्छेदन रावेर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून, सावदा पोलीस ठाण्याचे पथक पुढील तपास करीत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे रणगाव व परिसरात शोककळा पसरली आहे.