नंदुरबार (25 सप्टेंबर 2025) : शहरात जय वळवी या तरुणाचा झालेल्या खुनानंतर निषेधार्थ निघालेल्या मूक मोर्चा नंदुरबारमध्ये हिंसक वळण लागले. आदिवासी संघटनांच्या पुढाकाराने जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयावर निघालेल्या शांततापूर्ण मोर्च्यानंतर काही उपद्रवींनी अचानक हाणामारी, दगडफेक व गाड्यांची तोडफोड केली. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला.

काय घडले नंदुरबार शहरात ?
काही दिवसांपूर्वी शहरात जय वळवी या युवकावर सूर्यकांत मराठे या आरोपीने चाकूहल्ला केला होता. गंभीर जखमी अवस्थेत जय वळवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे आदिवासी समाजात तीव्र संताप निर्माण झाला होता. याच निषेधार्थ आदिवासी संघटनांनी बुधवारी नंदुरबार शहर बंद ठेवत जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयावर मूक मोर्चा नेला.
मोर्चा शांततेत मात्र उपद्रवींनी काढले डोके वर
मोर्चा सुरुवातीस पूर्णपणे शांततेत पार पडला मात्र जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचल्यानंतर काही अज्ञात उपद्रवींनी सरकारी वाहनांवर दगडफेक सुरू केली आणि काही गाड्यांची तोडफोड केली. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही बाजूंमध्ये दगडफेक सुरू झाली. परिणामी, शहरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करत आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत जमावावर नियंत्रण मिळवले.
पोलिस अधिकारी व कर्मचारी जखमी
या घटनेत एक पोलीस अधिकारी, एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांच्यासह इतर काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असून पोलिसांकडून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
जय वळवी प्रकरणात आरोपीला तातडीने कठोर शिक्षा व्हावी, खटला विशेष न्यायालयात चालवण्यात यावा आणि मृत जय वळवीला न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी आदिवासी संघटनांकडून करण्यात आली तसेच आरोपीस फाशी द्यावी या घोषणांनी मोर्चा परिसर दणाणला.