अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी लाच : राहत्यातील पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Police constable caught in ACB’s trap for accepting bribe of Rs 15,000 राहता, ता.अहिल्यानगर (26 सप्टेंबर 2025) : 15 हजारांची लाच घेताना राहता पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍याला अहिल्यानगर एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली आहे. या कारवाईने पोलिस दलातील लाचखोर पुरते हादरले आहेत. अनिल रामचंद्र गवांदे (35, बागडे बिल्डींग, घर नं.4, बागडे वस्ती, 14 चारी, राहता) असे अटकेतील कर्मचार्‍याचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांचा खडी, मुरूम व वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. गुरुवार, 18 रोजी राहता पोलिसांनी तक्रारदाराचा डंपर पकडला होता व पोलिस कॉन्स्टेबल गवांदे यांनी नियमित अवैध वाहतूक चालू ठेवायची असल्यास नियमितपणे 20 हजारांचा हप्ता द्यावा लागेल, अशी मागणी केली होती. तक्रारदाराने अहिल्यानगर एसीबीकडे 24 रोजी तक्रार दिल्यानंतर पडताळणी केल्यानंतर त्यात 15 हजारांची लाच मागणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने सापळा रचण्यात आला.

गुरुवारी गवांदे यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकताच त्यास अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपूटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, नाईक चंद्रकांत काळे, शेखर वाघ, किशोर कुळघर, चालक दशरथ लाड आदींच्या पथकाने यशस्वी केला.