Water crisis in the state: Deadline for filing 12th exam applications extended till October 20 ; Deputy Chief Minister Eknath Shinde मुंबई (29 सप्टेंबर 2025) : राज्यातील मराठवाड्यासह नाशिक, सोलापूर, अहिल्यानगरसह इतर भागांमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बारावी बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना येत असल्याने बारावी बोर्डाने विद्यार्थी हितासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश
बारावी परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2025 होती मात्र पूरग्रस्त भागातील अनेक विद्यार्थी आणि पालकांनी अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली होती. या विनंतीची तातडीने दखल घेत एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
शिक्षण विभागाचा तातडीने निर्णय
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी तत्काळ राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधला आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, शिक्षण विभागाने बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. यासंदर्भात शिक्षण विभागामार्फत लवकरच परिपत्रक जारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यासोबतच, बाह्य पद्धतीने परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत, तर नवीन परीक्षा केंद्रांसाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे पूर आणि अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.