चाळीसगावात रेल्वेची ओएचई वायर चोरी : रेल्वे सुरक्षा बलाच्या कारवाईत तीन चोरट्यांना बेड्या

Railway OHE wire theft : Suspect in Chalisgaon caught भुसावळ (29 सप्टेंबर 2025) : चाळीसगाव आरपीएफ ठाण्या अंतर्गत झालेल्या रेल्वे संपत्ती चोरी प्रकरणातील संपूर्ण मालमत्ता जप्त करण्यात आरपीएफला यश आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत चाळीसगावातील तीन संशयीतांना अटक करण्यात आली. गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहनदेखील जप्त करण्यात आले. रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

काय घडले चाळीसगावात?
30 ऑगस्ट रोजी आरपीएफ ठाण्यात दाखल गुन्हा अंतर्गत अज्ञात संशयीतावर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिल्या होत्या. या गुन्ह्यात चाळीसगाव खडकी बायपास रोडवरील गोडाऊनमधून तब्बल 360 मीटर, 65 मिमी, वजन 215 किलो, सुमारे एक लाख 40 हजार रुपये इतक्या किंमतीची ओएचई (कॅटेनरी) वायर चोरी झाल्याची नोंद झाली होती.

या संशयीतांना अटक
तपासादरम्यान, संशयितांचा सीडीआर तपासून चौकशी अंती वॉचमन विकास ओंकार बागुल (33, रा.चाळीसगाव) आणि अफसर शेख रशीद मोहम्मद (35, रा.चाळीसगाव) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या कबुलीनुसार पोलिसांनी प्रथम 25 किलो वायर जप्त केली. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही संशयीतांना 4 दिवसांची आरपीएफ कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यात तपासात आणखी एक वॉचमन शिवाजी ओंकार सोनवणे (52, रा. चाळीसगाव) यानेही गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक केली. या प्रकरणात तीन जणांना अटक झाली आहे. दरम्यान, संशयीत अफसर शेख रशीद याने दिलेल्या माहितीवरून उर्वरित चोरीचा माल व वापरलेली गाडी कुठे लपवली आहे हे सांगितले.

त्यानुसार आरपीएफ पथकाने पंचासमक्ष तपासणी करून 318.14 मीटर (190 किलो) वायर एक लाख 23 हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी (एमएच 19 बीयु 3856) कार जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण 360 मीटर (215 किलो) वायर,1 लाख 40 हजार रुपये आणि गुन्ह्यातील वाहन अशा सर्व चोरीस गेलेल्या रेल्वे संपत्तीची पूर्णपणे जप्ती करण्यात आली आहे. अद्याप काही संशयीत पसार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती आरपीएफ वरिष्ठ आयुक्त जोशी यांनी दिली.