उधना-ब्रह्मपूर ‘अमृत भारत एक्सप्रेस’चे भुसावळात स्वागत

‘Amrut Bharat Express’ runs on Udhna-Brahmapur route; Arrives in Bhusawal one and a half hours late भुसावळ (29 सप्टेंबर 2025) : उधना-ब्रह्मपूर या मार्गावर धावणारी अमृत भारत एक्सप्रेस शनिवारी स्वागत गाडी म्हणून सोडण्यात आली मात्र ही गाडी भुसावळ जंक्शनवर नियोजित वेळेपेक्षा तब्बल दीड तास उशिरा दाखल झाली. मार्गातील विविध ठिकाणी नागरिक व लोकप्रतिनिधीतर्फे करण्यात आलेल्या स्वागतामुळे गाडीला उशीर झाल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

जल्लोषात झाले स्वागत
गाडी 09021 उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस उद्घाटन विशेष गाडी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10.50 वाजता उधना येथून सुटून संध्याकाळी सव्वा सहा वाजता भुसावळच्या प्लॅटफॉर्म क्रमांक आठवर दाखल झाली. गाडी येण्यापूर्वी रेल्वे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. गाडीचे आगमन होताच प्रवाशांची मोठी गर्दी झाली. यावेळी डीआरएम पुनीत अग्रवाल, रेल्वेचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी गाडीचे स्वागत करून हिरवा झेंडा दाखवत गाडी पुढे मार्गस्थ झाली.स्थानिक प्रतिनिधी, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत स्टेशनवर गाडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

नियमित सेवा 5 ऑक्टोबरपासून
या गाडीची नियमित सेवा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. गाडी 19021 उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस दर रविवारी सकाळी 7.10 वाजता उधना येथून सुटेल व दुसर्‍या दिवशी दुपारी 1.55 वाजता ब्रह्मपुर येथे पोहोचेल तर गाडी 19022 ब्रह्मपुर -उधना अमृत भारत एक्सप्रेस दि.6 ऑक्टोबरपासून दर सोमवारी रात्री 11.45 वाजता ब्रह्मपुर येथून सुटून तिसर्‍या दिवशी सकाळी 8.45 वाजता उधना येथे पोहोचेल.