नोकरीच्या आमिषाने चाळीसगावच्या शेतकर्‍याची दोन लाखात फसवणूक

Chalisgaon farmer cheated out of Rs 2 lakh on the promise of a job चाळीसगाव (30 सप्टेंबर 2025) : सर्वदूर ओळखी-पाळखी असल्याने दोन लाख रुपये दिल्यास मुलाला सरकारी नोकरी लावून देवू, असे सांगून शेतकर्‍याचा विश्वास संपादन करीत दोन लाख लुबाडण्यात आले. या प्रकरणी जळगावच्या तिघांविरोात शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण ?
शांताराम महादू पाटील (53, रा.मुंदखेडे बु.॥, ता.चाळीसगाव) यांच्या फिर्यादीनुसार, 24 डिसेंबर 2024 रोजी जळगाव रेल्वे स्टेशनकडून सार्वजनिक रस्त्यावर ही रक्कम संबधित संशयित आरोपींना देण्यात आली. यावेळी बाळासाहेब ऊर्फ ज्ञानेश्वर हरचंद पाटील (रा. उत्रान, ता. एरंडोल), भिवसन महाले (रा.मेहुटे, ता.पा1रोळा) आणि खंडू बापू महाले (रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) या तीन संशयितांनी संगनमत केले. त्यांनी फिर्यादीच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन देत, शांताराम पाटील यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले आणि त्यांची फसवणूक केली.

शहर पोलिसात गुन्हा दाखल
फसवणुकीनंतर शांताराम पाटील यांनी हे पैसे परत मिळावेत, यासाठीची मागणी केली असता खंडू महाले याने शांताराम पाटील यांना फोनद्वारे शिविगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या फसवणूक प्रकरणी जळगाव शहर पोलिसात सोमवार, 29 सप्टेंबर रोजी तिन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक अशोक खेडकर तपास करीत आहेत.