गायीला वाचवताना दुचाकी घसरली : अमळनेरची विवाहिता जागीच ठार तर पती गंभीर

Bike accident while returning from worshipping the goddess : Amalner married woman dies, husband injured अमळनेर (1 ऑक्टोबर 2025) :  देवी दर्शनावरून परतताना दुचाकीसमोर गाय आल्याने तिला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकी अनियंत्रीत झाल्याने झालेल्या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला तर पती जखमी झाला. हा अपघात टाकरखेडा रस्त्यावरील बुलढाणा अर्बन बँकेच्या गोदामासमोर मंगळवार, 30 रोजी दुपारी पावणेदोन वाजता घडला. मंगलाबाई मधुकर ठाकरे (51, गुरुकृपा कॉलनी, मार्केटमागे, अमळनेर) असे मृत विवाहितेचे तर मधुकर नारायण ठाकरे (55, अमळनेर) असे जखमी पतीचे नाव आहे.

अचानक गाय आल्याने अपघात
मधुकर नारायण ठाकरे (अमळनेर) हे पत्नी मंगलाबाईसह दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.एन.8514) ने सती माता मंदिरात दर्शनाला गेले होते. परतीच्या प्रवासात अमळनेर-टाकरखेडा रस्त्यावरील बुलढाणा अर्बन बँकेच्या गोदामासमोर रस्त्यात अचानक गाय आल्याने दुचाकी घसरली.

या अपघातात मंगलबाई ठाकरे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मधुकर यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी अशोक नारायण ठाकरे (58, अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मधुकर नारायण ठाकरे यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.