Illegal sand mining claims lives : Jalgaon’s Mai-Lek dies after being hit by dumper, husband and son critical जळगाव (1 ऑक्टोबर 2025) : वाळू वाहतूक करणार्या भरधाव डंपरने कारला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला तर वडिलांसह मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मन विषन्न करणारा हा अपघात जळगाव तालुक्यातील विदगाव येथील तापी नदीच्या पुलावर मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडला.

अवैध वाळू नागरिकांच्या जीवावर
जळगावच्या विठ्ठल नगरातील शिक्षक निलेश प्रभाकर चौधरी (36) हे परिवारासह चोपडा येथे देवीच्या दर्शनार्थ गेले होते. परतीच्या प्रवासात विदगाव पुलावर त्यांच्या चारचाकीला भरधाव डंपरने धडक दिल्याने कार हवेत चेंडू प्रमाणे उधळली व नदीपात्रात जावून कोसळली
या अपघातात निलेश चौधरी आणि त्यांचा धाकटा मुलगा ध्रुव निलेश चौधरी (वय 4) हे गंभीर जखमी झाले तर त्यांच्या पत्नी मीनाक्षी निलेश चौधरी (33) व मोठा मुलगा पार्थ निलेश चौधरी (वय 12) यांचा जागीच मृत्यू झाला.
निलेश चौधरी हे धानोरा येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून मयत मीनाक्षी चौधरी या शिवाजीनगर मधील पाटणकर शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
या अपघातानंतर वाळूने भरलेला डंपर पुलावर आडवा पडल्यामुळे दोन्ही बाजूंनी येणारी-जाणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. चोपड्याकडून जळगावकडे येणारी तसेच जळगावहून चोपड्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराने मोठ्या प्रमाणात आक्रोश केला. जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक नियंत्रीत केली व जखमींना उपचारासाठी नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात हलवले.