प्रवाशांना दिलासा : दिवाळीसह छठपूजेसाठी विशेष गाड्या धावणार !

Relief for passengers: Special trains will run for Diwali and Chhath Puja! भुसावळ (2 ऑक्टोबर 2025) : आगामी दिवाळी सणासह छठपूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. बिहार, उत्तरप्रदेश, ओडिशा व महाराष्ट्रातील विविध भागात जाणार्‍या प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे. भुसावळ जंक्शनवरून जाणार्‍या प्रवाशांना सुध्दा या गाड्यांचा लाभ मिळणार आहे.

या गाड्यांचा प्रवाशांना दिलासा
पुणे-दानापूर-पुणे विशेष या गाडीच्या 40 फेर्‍या होतील. यात गाडी 01481 पुणे ते दानापूर 26 सप्टेंबर ते 1 डिसेंबर या काळात प्रत्येक सोमवार व शुक्रवारी सुटणार आहे. तसेच गाडी 01482 दानापूर ते पुणे ही गाडी 28 सप्टेंबर ते 3 डिसेंबर या काळात प्रत्येक बुधवार व रविवार धावणार आहे.

पुणे-गाझीपूर सिटी-पुणे विशेष गाडीच्या 38 फेर्‍या होणार आहे. गाडी 01431 पुणे ते गाझीपूर सिटी ही गाडी 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान,प्रत्येक शुक्रवार व मंगळवारी सुटणार आहे. गाडी 01432 गाझीपूर सिटी ते पुणे दरम्यान 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबर या काळात प्रत्येक शनिवार व बुधवार सुटणार आहे.

नागपूर-हडपसर -नागपूर या विशेष गाडीच्या 36 फेर्‍या होणार आहे. यात 01201 नागपूर ते हडपसर ही गाडी 29 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर या दरम्यान प्रत्येक सोमवार व गुरुवार सुटणार आहे. तसेच गाडी 01202 हडपसर ते नागपूर ही गाडी 30 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर या काळात प्रत्येक मंगळवार व शुक्रवार सुटणार आहे.

तसेच उधना – पुरी – उधना विशेष गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. यात 08472 उधना ते पुरी दि.23 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर या काळात प्रत्येक मंगळवारी सुटेल तर परतीच्या प्रवासात 08471 पुरी ते उधना ही गाडी 22 सप्टेंबर ते 24 नोव्हेंबरमध्ये प्रत्येक सोमवारी सुटेल, या गाड्यांना भुसावळ,जळगावसह विविध मध्यवर्ती स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी एसी, स्लीपर आणि साधारण द्वितीय श्रेणीचे डबे असतील.