This year, drone cameras are keeping an eye on the Durga Visarjan procession in Bhusawal! भुसावळ (2 ऑक्टोबर 2025) दुर्गा विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे. यंदा विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांतर्फे ड्रोन लावून नजर ठेवली जाणार आहे. शहरातील 188 सार्वजनिक मंडळे शुक्रवार, 3 ऑक्टोबर रोजी देवीचे विधीवत विसर्जन करतील तर मुख्य विसर्जन मिरवणुकीत 52 मंडळे सहभागी होतील.दरम्यान, देवी विसर्जनामुळे शहरातील बसस्थानकाचे दुपारी एक वाजेनंतर एस.टी.आगारात स्थलांतर करण्यात येईल.

दुपारी निघणार विसर्जन मिरवणूक
शुक्रवारी शहरातील नृसिंह मंदीरापासून दुर्गा विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होईल. यंदा 52 मंडळांना पोलिसांनी परवानगी दिली असून शहरात 188 मंडळांतर्फे दुर्गा स्थापना केली आहे. मिरवणुकी व्यक्तीरिक्त अन्य मंडळे ही परस्पर नदीवर देवीची मूर्ती नेत विसर्जन करतील. काही मंडळातर्फे मूर्ती थेट वाघूर धरणावर विसर्जनाला नेल्या जातात. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पालिका व पोलिस प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. शहरातील विविध भागात सीसीटिव्ही कॅमेरे लावले जाणार आहे. यामुळे मिरवणुकीतील उपद्रवींवर कॅमेर्याची नजर असेल. मिरवणुकीत सुमारे 20 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती असतील. मिरवणूक लवकर काढण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे.
शहरात मंगळवारी पोलिसांकडून रूटमार्च काढण्यात आला. डीवायएसपी संदीप गावीत यांच्या नेतृत्वाखाली रूटमार्चचे आयोजन करण्यात आले.
मिरवणूक मार्गावर तिसर्या डोळ्याची नजर
विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर विशेष करून सराफ बाजार, मरीमाता मंदीर परिसर, मोठी मशीद, बाजारपेठ पोलिस ठाणे, गांधी पुतळा, शहर पोलिस ठाण्यासमोर, यावल नाका, राहूल नगरजवळ, तापीनदीवर येथे फोकस व सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलिसांकडून मिरवणुकीचे व्हीडीओ चित्रीकरण होईल.
भुसावळ बसस्थानक दुपारनंतर डेपोत
शुक्रवारी दुर्गा विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर येथील बसस्थानक हे दुपारी एक वाजेनंतर वरणगाव रोडवरील एस.टी.डेपोत स्थलांतरीत होईल प्रवाशांना जर प्रवासाला जायचे असल्यास त्यांना एसटी डेपोत जावे लागेल.
शुक्रवारी 15 उपरस्ते होणार बंद
मुख्य मिरवणूक मार्गावर नृसिंह मंदिर ते स्टेशन रोडवरील अमर स्टोअर्सपर्यतच्या मार्गाला जोडले जाणारे 14 उपरस्ते शुक्रवारी बॅरेकेट लावून बंद होतील. बंद होणार्या रस्त्यात शाळा क्रमांक पाच कडे जाणारा रस्ता, भास्कर मार्केट,शनि मंदीर वॉर्डाला जोडणारे तीन मार्ग,अप्सरा चौकातून विठ्ठल मंदीर वॉर्डाला जोडणारा मार्ग,गणेश मॉलपासून शनि मंदीर वॉर्डला जोडणारा वखार मार्ग,मरिमाता,मंदीर व्हीएम वॉर्डाला जोडणारा रस्ता,जामा मशीद लक्ष्मी चौकातून राम मंदिर वॉर्ड व खाल्लमा दर्गा भागाला जोडणार्या दोन्ही उपरस्त्याचा समावेश आहे.सराफ बाजारातून ओसवाल पंचायती वाडा,भजे गल्लीला जोडणारा रस्ता, मॉडर्न रोडपासून चिरा गल्लीला जोडणारा रस्ता,जनता टॉवर पासून इस्कॉन मुरलीधर मंदिराला जोडणारा रस्ता सुध्दा बंद राहणार आहे. जामनेर रोड सुध्दा एका बाजूने बॅरेकेट लावून बंद असेल. एका मार्गाने दुर्गोत्सव मंडळे तर दुसर्या बाजूने नित्याची वाहतूक राहणार आहे.
यंदा ड्रोन कॅमेर्याची नजर
दोन वर्षापूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन कॅमेर्यांची नजर होती. यंदा सुध्दा संपूर्ण मिरवणूकीवर ड्रोन कॅमेर्यांची नजर असेल, असे पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत म्हणाले. संपूर्ण मिरवणूक मार्गावर आणि मशीद चौकात या कॅमेर्याद्वारे चित्रीकरण होईल. विसर्जन मार्गावर सुध्दा सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. आरसीपी प्लॅटून, ट्रॅकींग फोस यांची प्रत्येकी एक तुकडी, होमगार्ड, पोलिस,एलसीबी कर्मचारी बंदोबस्तावर असतील, असे पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत म्हणाले.