Copper wire worth Rs 40 lakhs stolen from Deepnagar despite 24-hour security भुसावळ (3 ऑक्टोबर 2025) : सुरक्षा रक्षकांचा 24 तास गराडा असतानाही दीपनगरातील 132/33 केव्ही उपकेंद्राच्या आवारातून सुमारे 40 लाखांची कॉपर वायर चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सातत्याने कोट्यवधी रुपयांच्या होणार्या चोर्या या विम्याचा लाभ मिळवण्यासाठी तर होत नाही ना? असा प्रश्न विचारण्यास वाव आहे. 24 तास सुरक्षा रक्षक तैनात असताना या चोर्या होतातच कशा? या प्रकारात नेमके कोण सहभागी आहेत? याचा तपास पोलिस यंत्रणेने प्रामाणिकपणे करण्याची आवश्यकता आहे.

काय घडले दीपनगरात ?
पारेषणचे उपकार्यकारी अभियंता ब्रिजेंद्रकुमार बुद्धसेन पटेल (42, गुलमोहर प्रेस्टीजवळ, भुसावळ, मूळ रा.रघुराज नगर, जि.सतना, मध्यप्रदेश) यांच्या फिर्यादीनुसार, 27 सप्टेंबर 2009 ते 27 मे 2025 सकाळी 9.30 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी 132/33 केव्ही उपकेंद्र दीपनगर ईसीआर आवारात असलेल्या जळालेल्या ट्रान्सफार्मरमधून 39 लाख 37 हजार 500 रुपये किंमतीची तांब्याची तार लांबवली. तपास पोलिस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करणार
भुसावळ तालुका पोलिस निरीक्षक महेश गायकवाड म्हणाले की, दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने या भागातील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात येईल तसेच सुरक्षा रक्षक तैनात असतानाही चोरीची झालेली घटना गंभीर आहे. सखोल तपास करून या प्रकरणाच्या तळाशी पोहोचून योग्य ती कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.