व्यापारी सुखावले : दसर्‍याच्या खरेदीने बाजारात उत्साहाची लाट

200 वर दुचाकींची विक्री : अनेकांनी केला नूतन घरात प्रवेश

Dussehra celebrated by traders in Bhusawal : Turnover in crores भुसावळ (3 ऑक्टोबर 2025) : दसर्‍यापूर्वी जीएसटी दरात झालेली घट, रेल्वेतर्फे जाहीर झालेला बोनस यामुळे पैशांची रेलचेल वाढली असतानाच दसरा सणाचा इव्हेंट व्यापार्‍यांसाठी सुवर्ण पर्वणी ठरला. कपडे, फळे, फुले, दुचाकी,इलेक्ट्रॉनिक्स आणि दागिने यांसारख्या विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली तर प्लॉटसह नूतन घरांचे बुकींग तसेच खरेदी झाल्याने शहरात सुमारे तीन कोटींवर उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

व्यापार्‍यांना पावला दसरा
दसर्‍यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठी गर्दी झाली. सीताफळे, सफरचंद, झेंडू फुले, कपडे, विविध पूजा साहित्याला मागणी राहिली तर गोड-धोड पदार्थ घेण्यासाठी ग्राहकांची रांग लागल्याचे चित्र होते.

सकाळापासूनच शहर व ग्रामीण भागातील ग्राहक बाजारात दाखल झाले होते. दुपारच्या आत अनेक ग्राहकांनी खरेदी करून घरचा रस्ता धरला. ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांकडून कपडे खरेदीला अधिक गर्दी होती. रेडीमेड कपड्यांना पसंती होती. दसर्‍यानिमित्त खरेदीमुळे स्थानिक व्यवसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.

दुकानांची आकर्षक सजावट आणि सवलतीमुळे ग्राहकांना खरेदीकडे ओढले गेले. एकूणच, शहरात दसर्‍याची खरेदी उत्साहात पार पडली, अशी भावना व्यापार्‍यांनी व्यक्त केली. बाजारपेठेत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभुमीवर बाजारपेठ पोलिस ठाण्यातील साध्या गणवेशातील पोलिसांची गस्त लावण्यात आली होती.

दागिने खरेदीला प्रतिसाद
दसर्‍याचा शुभ मुहूर्त साधत सोन्याच्या दागिन्यांची खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी होती. 1 ते 5 ग्रॅम वजनाची नाणी, आपट्याच्या पानांच्या आकाराचे सोन्याचे अर्धा ते 2 ग्रॅम वजनापर्यतची पाने, अंगठ्या, झुमके, बांगड्या, गळ्यातील चेन आदी दागिन्यांना मागणी राहिली.

झेंडू मात्र भाव खावून
दसर्‍यानिमित्त पूजेसाठी झेंडू फुलांना विशेष मागणी होती. नाडगाव, जळगाव, नगर, घाट येथून शहरात झेंडूची आवक झाली. जवळपास तीन टन झेंडू फुलांची विक्री झाली असून 60 ते 80 रुपये किलो फुलांचा दर होता. शहरातील प्रमुख रस्त्यांवर फुलांची दुकाने थाटण्यात आली. गांधी पुतळा, हंबर्डीकर चौक, वसंत टॉकीज परिसर, जामनेर रोड, जवाहर डेअरी परिसर आदी भागात दुकाने थाटण्यात आली.

200 हून बाईकची विक्री
दसर्‍याच्या मुहूर्तावर शहरातील विविध शोरूममधून सुमारे 200 दुचाकी वाहनांची विक्री झाली. अनेकांनी दोन दिवस आधीच आपली पसंतीची वाहने बुक करून ठेवली. दसर्‍याच्या दिवशी ती खरेदी करून वाहन घरी नेताना अनेकांचे चेहरे आनंदाने खुलले. इलेक्ट्रॉनिक्स गाड्यांनाही मागणी राहिली.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भाव खावून
टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईल, डीश वॉशर, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीलाही प्रतिसाद मिळाला. काही ग्राहकांनी खाजगी फायनान्स सुविधेचा लाभ घेत खरेदी केली. यंदा मोठ्या आकाराचे टीव्ही, पीठाची गिरणी, वॉशिंग मशीन यांना मागणी राहिल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.