लखनऊ-पुणे एक्सप्रेसमधील स्वच्छतेची भुसावळ डीआरएम यांनी केली पाहणी

Shramdaan at Bhusawal Railway Station on the occasion of Swachh Bharat Diwas along with Mahatma Gandhi Jayanti, the father of the nation भुसावळ (3 ऑक्टोबर 2025) : भुसावळ विभागात स्वच्छता ही सेवा 2025 अभियानांतर्गत गुरुवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच स्वच्छ भारत दिन साजरा करण्यात आला. डीआरएम पुनीत अग्रवाल यांनी विभागीय कार्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी डीआरएम अग्रवाल यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानक परिसरात श्रमदान केले. यावेळी एडीआरएम (प्रशासन) सुनील कुमार सुमन, एडीआरएम (तांत्रिक) एम.के.मीनासह वरिष्ठ अधिकारी व रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

भुसावळ रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेकडील भागात डीआरएम पुनीत अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली विशेष स्वच्छता श्रमदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या अभियानात रेल्वेचे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे शाळेचे शिक्षक व विद्यार्थी, स्काउट-गाईड सदस्य तसेच स्थानक कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेत परिसराची स्वच्छता करून जनतेला स्वच्छतेचा संदेश दिला.

भुसावळ स्थानकावरील प्लॅटफॉर्म चारवर प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी रेल्वे शाळेच्या विद्यार्थ्यांनी नुक्कड नाटक सादर केले. या नाटकात स्वच्छतेचे महत्त्व, प्रवाशांचा सहभाग व अस्वच्छता टाळण्याचा संदेश प्रभावी व सोप्या पद्धतीने मांडण्यात आला.

डीआरएम पुनीत अग्रवाल यांनी गाडी (12104) लखनऊ-पुणे एक्सप्रेसचे स्थानकावर निरीक्षण करून गाडीत स्वच्छतेची स्थिती पाहणी केली. निरीक्षणादरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. व स्वच्छता ठेवण्याबाबत सहकार्याचे आवाहन केले. प्रवाशांना रेल्वे प्रवास स्वच्छ व सुखद ठेवण्यासाठी त्यांची भूमिकाही तितकीच महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

भुसावळ विभागातील सर्व स्थानके, डेपो व कार्यशाळांमध्येही स्वच्छता जनजागृती अभियानांतर्गत श्रमदान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.