Murder of a young man in Jalgaon : The accused was arrested by the Crime Branch within a few hours जळगाव (3 ऑक्टोबर 2025) :जुन्या वादातून कासमवाडी परिसरात शुक्रवार, 3 ऑक्टोबर रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका जाधव (27, रा.कासमवाडी) या तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. जळगाव गुन्हे शाखेने या प्रकरणी योगेश संतोष पाटील उर्फ पिंटू (27, कासमवाडी, जळगाव) यास बेड्या ठोकल्या आहेत.

खुनाने हादरले शहर
जळगावच्या कासमवाडी परिसरात राहणार्या ज्ञानेश्वर उर्फ नानाचा घरासमोर राहणार्या काही तरुणांशी जुना वाद होता. शुक्रवार, 3 ऑक्टोबर रोजी रात्री 12.30 वाजता कासमवाडी येथील एकता मित्र मंडळ येथे उभा असताना त्याच्या घरासमोर राहणार्या दोन जणांनी जुन्या वादातून त्याच्या पोटावर तसेच मांडीवर धारदार शस्त्राने वार केले. यात ज्ञानेश्वर उर्फ नाना हा गंभीर जखमी झाला.
घटनेत नाना उर्फ ज्ञानेश्वर हा गंभीर जखमी झाल्याने त्याला मित्रांनी तातडीने दुचाकी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात अतीदक्षता विभागात उपचार सुरू असताना तासाभरात त्याचा मृत्यू झाला. खुनाची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, फौजदार चंद्रकांत धनके यांच्यासह पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.
एका आरोपीला काही तासात बेड्या
जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, हवालदार नितीन बाविस्कर, नाईक किशोर पाटील, छगन तायडे, रवींद्र कापडणे आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.