कृषिमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त आमदार अमोल जावळे यांच्या पुढाकारातून विवरे-अजंदे रस्त्याचे भूमिपूजन

Big relief for farmers: Groundbreaking ceremony of Vivare-Ajande road यावल (3 ऑक्टोबर 2025) : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विवरे-अजंदे या महत्त्वाच्या ग्रामीण रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन कृषिमित्र स्व. हरीभाऊ जावळे यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात झाले. स्थानिक ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे.

25 वर्षानंतर शेतकर्‍यांना दिलासा
गेल्या 25 वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय होती. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे ग्रामस्थांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेतमाल वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. या विकास कामामुळे परिसरातील जनजीवन सुलभ होणार असून हा रस्ता ग्रामस्थांसाठी जीवन वाहिनी ठरणार आहे. विवरे व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना या मार्गाने थेट रेल्वे स्टेशनपर्यंत जाणे सोयीचे होणार आहे. विशेषतः केळी वाहतुकीसाठी या रस्त्याचा मोठा फायदा शेतकर्‍यांना होणार आहे.

निवडून आल्यानंतर सहा महिन्यात रस्त्याचे भूमिपूजन : आमदार जावळे
आमदार अमोल जावळे म्हणाले, बाबांच्या काळापासून या रस्त्याची मागणी सुरू होती परंतु काही कारणास्तव हे काम पूर्ण होऊ शकले नाही. परंतु मला आनंद आहे की निवडून आल्याच्या केवळ सहा महिन्यांत मी या रस्त्याचे भूमिपूजन करू शकलो. आपण मला भरभरून मतदान केले आहे, त्यामुळे या मतदारसंघाचा कायापालट करणे ही माझी जबाबदारी आहे. मागील पाच वर्षांत विकासकामे थांबली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनुशेष राहिला आहे. मात्र, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा अनुशेष आम्ही नक्कीच भरून काढू.

यांची भूमिपूजनप्रसंगी उपस्थिती
या भूमिपूजन सोहळ्याला ग्रामस्थ, महिला, युवक तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश धनके, पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, अरुण शिंदे, विजय महाजन, दुर्गादास पाटील, राजन लसूरकर, रंजनाताई पाटील, हेमराज लासुरे, पी. के. महाजन, वासू नरवडे, सी. एस. पाटील, हरलाल कोळी, जुम्मा तडवी, दुर्गेश पाटील, सूर्यकांत पाटील, रवी पाटील, प्रविण पाचपोहे, संदीप पाटील, गोंडू महाजन, शीतल पाटील, चेतन पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.