महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्रींना भुसावळात अभिवादन

Students donated their labor at Bhole College in Bhusawal भुसावळ (3 ऑक्टोबर 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे 2 ऑक्टोंबरचा दिवस विविध कार्यक्रम घेत साजरा करण्यात आला.

यांचा श्रमदानात सहभाग
महात्मा गांधींनी श्रमदानाच्या दिलेल्या शिकवणीनुसार विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरा स्वच्छ केला. या श्रमदान सत्रात प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे तिन्ही कार्यक्रम अधिकारी तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे नाशिक विभागीय संघटक प्रमुख प्रा.डॉ.दयाघन राणे यांनी विद्यार्थ्यांसोबत सहभाग घेतला.

श्रमदान सत्रानंतर बौद्धिक कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी संयुक्तरित्या साजरी करीत दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्याहस्ते माल्यार्पण करण्यात आले.

प्रसंगी प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या त्रीसूत्रीच्या माध्यमातून दिलेल्या स्वातंत्र्यलढ्यातील काही घटनांना उजाळा दिला. गांधीजींच्या शिकवणीतील स्वावलंबनाचे महत्व स्पष्ट केले.

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे नाशिक विभागीय संघटक प्रमुख प्रा. डॉ.दयाघन एस. राणे यांनी नशाबंदी मंडळाने पुरवलेल्या प्रबोधनात्मक पोस्टर्सचे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी खुले केले. त्यामधील दारू, गुटखा, तंबाखूचे दुष्परिणाम स्पष्ट करून महात्मा गांधींच्या व्यसनाविषयक विचारांची माहिती विद्यार्यी विद्यार्थिनींना दिली.

पोस्टर प्रदर्शन पहिल्या नंतर विद्यार्थ्यांनी आपल्याला व्यसनांच्या गांभीर्याबद्दल माहिती मिळालेली असून आपण व्यक्तिगत जीवनात कोणतेही व्यसन करणार नसल्याचा संकल्प केला.

प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.अनिल सावळे यांनी केले. उपस्थितांचे आभार महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.श्रेया चौधरी यांनी मानले. प्रसंगी क्रीडा संचालक
प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर तसेच शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश सावळे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनींची उपस्थिती होती.